Pimpri news: पाणीपुरवठ्याबाबत माहिती देता न आल्याने रामदास तांबेंवर उपमहापौर बरसले

संतापलेले तुषार हिंगे बैठक सोडून निघून गेले; हिंगे यांनी आयुक्त आणि प्रशासनाचा केला निषेध

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात गढूळ पाणीपुरवठा का होत आहे. पाण्याबाबत तक्रारींत वाढ का झाली आहे. कोरोना आप्तकालीन परिस्थितीमध्ये पाणीपुरवठ्याचे काय नियोजन केले आहे, या संदर्भात समाधानकारक माहिती देता न आल्याने पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता रामदास तांबे यांच्यावर उपमहापौर तुषार हिंगे चांगलेच भडकले. विभागप्रमुख असूनही माहिती नसेल तर बैठकीला का आलात, असा सवाल करीत तीव्र नापसंती व्यक्त करीत ते बैठक सोडून निघून गेले. तसेच त्यांनी आयुक्तांसह प्रशासनाचा निषेध केला.

पाणीपुरवठ्याबाबत शहरात तक्रारी वाढल्या आहेत. त्याबाबत चर्चा करण्यासाठी उपमहापौर हिंगे यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक आयोजित करण्याची मागणी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्याकडे केली होती. त्यानुसार महापौरांनी मंगळवारी (दि.22) मधुकरराव पवळे सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते. त्यात हा प्रकार घडला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर ढोरे होत्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त अजित पवार, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, नगरसेवक अभिषेक बारणे, तुषार कामठे, पाणीपुरवठा विभागप्रमुख रामदास तांबे, कार्यकारी अभियंता रामनाथ टकले, अ. वि. सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

बैठकीत उपमहापौर हिंगे यांनी पाणीपुरवठा विभागाचे इतर अधिकारी कोठे आहेत, असा प्रश्‍न तांबे यांना केला. त्यावर मी विभागाचा प्रमुख असून सर्व माहिती मी देतो, असे त्यांनी ठामपणे सांगितले. हिंगे यांनी पाणीपुरवठ्याबाबत विविध 15 प्रश्‍न उपस्थित केले. ती यादीच समोर ठेवली. त्यावर तांबे चक्रावून गेले. त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाही.

माहिती घेऊन 3 ते 4 दिवसांत उत्तरे देतो, असे सांगत त्यांनी सावरासावर करण्याचा प्रयत्न केला. त्यावर उपमहापौर हिंगे संतापले. तांबे यांना फैलावर घेत माहिती नाही तर बैठकीला का उपस्थित राहिलात. गेली 15 वर्षे पाणीपुरवठा विभागात काम करता, तुमच्याकडे माहिती कशी नाही. तुमच्या सारख्या नाकर्त्या अधिकार्‍यांमुळे शहराला पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. वाढत्या शहराच्या भविष्याच्या दृष्टीने पाणीपुरवठ्याबाबत ठोस नियोजन नाही, असे हिंगे म्हणाले. तसेच या प्रश्नी आपला संताप व्यक्त करीत हिंगे बैठकीतून निघून गेले.

दरम्यान, या अचानक घडलेल्या घटनेवर महापौर ढोरे व पक्षनेते ढाके यांनी बैठकीत सावरासावर करीत पुढील 4 दिवसांत सविस्तर माहिती द्यावी, असे आदेश तांबे यांना दिले. बैठकीत तांबे यांनी ठरल्याप्रमाणे उत्तरे देत पाणीपुरवठ्याचे काम कसे उत्तम आहे, असे भासविण्याचा प्रयत्न केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.