Pimpri News : नियम धाब्यावर, बंदी असूनही शहरात अनेक दुकाने खुली

एमपीसी न्यूज – अनंत चतुर्थीनिमित्त गर्दी टाळण्यासाठी पुणे, पिंपरी चिंचवड आणि कॅम्प परिसरात सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. त्यानुसार पालिकेने देखील आदेश निर्गमित केले आहेत. मात्र, पिंपरी चिंचवड शहरात आज (रविवारी, दि.19) अनेक ठिकाणी दुकाने खुली ठेवण्यात आली आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांनी याबाबत 17 सप्टेंबर रोजी आदेश जारी केला आहे. त्यानुसार शहरात सर्व प्रकारची दुकाने आणि मॉल्स बंद राहणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, यातून दवाखाने, मेडीकल आणि दुध वितरण तसेच, हॉटेल, रेस्टॉरंट आणि फूडकोर्ट (मॉल्समधील वगळून) यांना सूट देण्यात आली आहे. पण, शहरातील अनेक भागात दुकानदारांनी नियम धाब्यावर बसवत दुकाने खुली ठेवल्याचे दिसून आले.

चिंचवड, पिंपरी, निगडी, आकुर्डी, काळेवाडी, रहाटणी, पिंपळे सौदागर, थेरगाव, भोसरी याठिकाणी अनेक दुकानदारांनी दुकाने खुली ठेवली आहेत. तर, काही ठिकाणी हाफ शटर पद्धतीने दुकान सुरू ठेवल्याचे दिसून आले. दरम्यान, काही दुकानदारांनी इतर दुकाने सुरू असल्याबाबत नाराजी व्यक्त केली तर, नियमाचे बंधन फक्त ठराविक व्यवसायिकांनाच कशासाठी असा सवाल देखील उपस्थित केला.

सराफ व्यावसायिक मनीष सोनिगरा म्हणाले, ‘पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशानंतरही अनेक दुकाने सुरु आहेत. केवळ ज्वेलर्स दुकाने, कपड्यांची आणि अन्य काही दुकाने बंद करून काय उपयोग. प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे सर्वांनी पालन करायला हवे.’

आदेशाचे उल्लंघन करण्याऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 ते 60 आणि भारतीय दंड विधान कलम 188 नुसार कारवाई केली जाईल असे आदेशात म्हटले आहे. गणेश विसर्जनासाठी घाटावर नागरिकांनी गर्दी केली असून यावेळी गणेशभक्तांना शारीरिक अंतर आणि मास्क यांचा विसर पडला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.