Pimpri News : धडक कारवाई पथकाने अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांवरील कारवाईत सातत्य ठेवावे – आयुक्त राजेश पाटील

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहर हे देशातील सर्वात स्वच्छ व सुंदर शहर बनविण्यासाठी रस्ते, फुटपाथवरील अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी धडक कारवाई पथकाने सातत्य ठेवावे असे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले. धडक कारवाई पथकातील अधिकारी व कर्मचारी यांची कार्यशाळा शुक्रवारी (दि. 24) ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे झाली त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, शहर अभियंता राजन पाटील, सहशहर अभियंता मकरंद निकम, श्रीकांत सवणे, सतीश इंगळे, उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर, यांच्यासह सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, सिताराम बहुरे, सोनम देशमुख, सुचेता पानसरे, विजयकुमार थोरात, रविकिरण घोडके, कार्यकारी अभियंता संजय भोसले, प्रशासन अधिकारी, अतिक्रमण निरीक्षक, परवाना निरिक्षक, बीट निरीक्षक आदी उपस्थित होते.

या शहरातील नागरिकांची जगण्याची गुणवत्ता विकासकामांच्या माध्यमातून आपण ठरवू शकतो. सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आपली नैतिक जबाबदारी व भान ठेवून काम करावे. एकसंघपणे सर्वांनी काम करून येत्या वर्षात पिंपरी चिंचवड हे शहर देशांतील सर्वात सुंदर स्वच्छ व अतिक्रमण मुक्त शहर बनवण्याचा ध्यास सर्वांनी घ्यावा असेही आयुक्त राजेश पाटील म्हणाले.

प्रत्येक  बीट निरीक्षकाने आपल्या बीटमध्ये अनधिकृत बांधकाम व रस्त्यावर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी. पथारी व्यावसायिकांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करून त्यांचा रोजगार अबाधित राहील याची दक्षता घेण्याचे नियोजन करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिल्या.

32 प्रभागासाठी 32 धडक कारवाई पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना स्वतंत्र वाहन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सकाळी सात ते अडीच व अडीच ते साडेनऊ अशा दोन पाळ्यांमध्ये पथकातील कर्मचाऱ्यांनी काम करावे, अशाही सूचना त्यांनी दिल्या. सातत्याने गस्त घालावी व कारवाई करावी.

या पथकाने येत्या दोन महिन्यात सर्व अधिकारी व कर्मचारी मिळून ही कार्यवाही करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले. या शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्याच्या मोहिमेमध्ये बीट निरीक्षक व कर्मचाऱ्यांना अडचणी येतील परंतु त्यावर मात करुन हे ध्येय गाठावे. वेळप्रसंगी माझ्यासह सर्व अधिकारी तुमच्या बरोबर असतील, असेही आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.