Pimpri News: कोरोना काळात ‘धन्वंतरी स्वास्थ’ योजना गुंडाळली; पालिका कर्मचाऱ्यांकडून काळ्या फिती बांधून निषेध

'धन्वंतरी स्वास्थ' ही वैद्यकीय योजना 1 सप्टेंबर 2015 पासून लागू करण्यात आली होती. तथापि, प्रशासकीय कारणास्तव ही योजना 14 सप्टेंबर पासून स्थगित करण्यात येत आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचा-यांसाठी लाभदायक ठरत असलेली ‘धन्वंतरी स्वास्थ’ योजना कोरोनाच्या महामारीत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गुंडाळली आहे. कोरोना कालावधी कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. या काळात कर्मचाऱ्यांचा विरोध डावलून योजना बंद केल्याने कर्मचारी महासंघाने आक्रमक भूमिका घेतली आहे. कर्मचारी काळ्या फिती बांधून काम करत निषेध करत आहेत.

पिंपरी-चिंचवड पालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे आणि सरचिटणीस सुप्रिया सुरगुडे यांच्या नेतृत्वाखाली पालिका प्रवेशद्वारावर कर्मचाऱ्यांना काळ्या फिती बांधण्यात येत आहेत. कर्मचारी आज (दि.8) काळी फित बांधून दिवसभर काम करणार आहेत.

महापालिका सेवेतील, सेवानिवृत्त कर्मचा-यांसाठी ‘धन्वंतरी स्वास्थ’ ही वैद्यकीय योजना 1 सप्टेंबर 2015 पासून लागू करण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपासून ही योजना बंद करण्याचा घाट घातला जात होता. त्याऐवजी विमा पॉलिसी आणण्याचे प्रयत्न झाले. त्याला महासंघाने तीव्र विरोध केला आहे. असे असताना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अचानक 14 सप्टेंबर 2020 पासून रात्री 12 नंतर ही योजना स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘धन्वंतरी स्वास्थ’ ही वैद्यकीय योजना 1 सप्टेंबर 2015 पासून लागू करण्यात आली होती. तथापि, प्रशासकीय कारणास्तव ही योजना 14 सप्टेंबरपासून स्थगित करण्यात येत आहे. कृपया सर्व पॅनेलवरील रुग्णांलयांनी याची नोंद घेवून 15 सप्टेंबरच्या पहाटे एक नंतर धन्वंतरी योजनेतील कोणत्याही सभासदांना या योजनेअंतर्गत उपचाराकरिता दाखल करून घेवू नये असे आयुक्त हर्डीकर यांनी आदेशात स्पष्ट म्हटले आहे.

या आयुक्तांच्या निर्णयाला कर्मचारी महासंघाने तीव्र विरोध केला आहे. कोरोनाच्या महामारीत पालिकेचे कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. अनेकांना बाधा झाली आहे. काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

या कालावधीत ‘धन्वंतरी स्वास्थ’ ही वैद्यकीय योजना कर्मचाऱ्यांसाठी लाभदायक ठरत होती. प्रशासनाने या महामारीत योजना बंद करणे अतिशय चुकीचे आहे. आयुक्तांनी हा निर्णय मागे घ्यावा. अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.