Pimpri news: महापालिका कर्मचाऱ्यांचा विरोध डावलून ‘धन्वंतरी स्वास्थ’ योजना गुंडाळणार !

आयुक्त दबावाखाली काम करतात, पालिका बंद करण्याचा कर्मचारी महासंघाचा इशारा

योजना बंद करण्याची प्रक्रिया सुरु

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचा तीव्र विरोध डावलून, महासंघाशी चर्चा करुनच निर्णय घेण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे तोंडी आदेश, तसेच स्थायी समिती सभेने धन्वंतरी चालू ठेवण्याचा ठराव केला असतानाही आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिका कर्मचा-यांठी लागू असलेली ‘धन्वंतरी स्वास्थ’ योजना बंद करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्याचबरोबर खासगी विमा पॉलिसी लागू करण्याची कार्यवाही चालू आहे. दरम्यान, धन्वंतरी योजना बंद करण्यास आमचा तीव्र विरोध आहे. आयुक्तांनी कोणाच्या तरी दबावाखाली एकतर्फी निर्णय घेवू नये. वेळप्रसंगी महापालिका बंद करण्याचा इशारा कर्मचारी महासंघाने दिला आहे.

महापालिका सेवेतील, सेवानिवृत्त कर्मचा-यांसाठी ‘धन्वंतरी स्वास्थ’ ही वैद्यकीय योजना 1 सप्टेंबर 2015 पासून लागू करण्यात आली होती. 7500 कर्मचारी वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीसाठी 300 रुपये वर्गणी देत होते. तर, निवृत्त 150 कर्मचारी 150 रुपये वर्गणी भरत असून महापालिका 600 रुपये हिस्सा भरत होती.

आता नवीन विमा पॉलिसीचा 7500 आणि 1500 प्राथमिक शिक्षकांना लाभ होणार आहे. त्यासाठी वर्षाकाठी सुमारे 27 कोटी खर्च येईल, असा अंदाज आहे.

मागील काही महिन्यांपासून धन्वंतरी स्वास्थ योजना बंद करण्याचा घाट घातला जात होता. त्याऐवजी विमा पॉलिसी आणण्याचे प्रयत्न झाले. त्याला महासंघाचा तीव्र विरोध आहे. कोरोना काळात आयुक्तांनी 14 सप्टेंबर 2020 रोजी धन्वंतरी योजना बंद करुन प्रतिपुर्ती योजना लागू केली होती.

महासंघाने आयुक्तांच्या निर्णयाला औद्योगिक न्यायालयात आव्हान दिले. पण, सुनावणी चालू असतानाच आयुक्तांनी धन्वंतरी स्वाथ योजना चालू ठेवण्यात येईल, असे न्यायलयात सांगितले. त्यामुळे हा खटला संपला होता. त्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अचानक धन्वंतरी स्वास्थ योजना बंद करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

कर्मचा-यांचा विरोध असतानाही आयुक्त विमा पॉलिसीसाठी आग्रही का ?

महापालिकेतील कर्मचा-यांसाठी ‘धन्वंतरी स्वास्थ’ योजना लाभदायक ठरत आहे. त्यामुळे ही योजना बंद करण्यात येवू नये, अशी कर्मचारी महासंघाची आग्रही मागणी आहे. त्याला राष्ट्रवादी, शिवसेनेचेही समर्थन आहे.

धन्वंतरी स्वास्थ’ योजना चालू ठेवण्यासाठी 16 सप्टेंबर 2020 रोजी स्थायी समितीने सदस्यपारित ठराव देखील केला. उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कर्मचारी महासंघासोबत चर्चा करुनच निर्णय घेण्याचे निर्देश आयुक्तांना दिले होते.

आमदार अण्णा बनसोडे, शिवसेने गटनेते राहुल कलाटे यांनीही धन्वंतरी स्वाथ योजना चालू ठेवण्याची सूचना आयुक्तांना केली होती. असे असतानाही विमा पॉलिसी लागू केली जाणार आहे.

दरम्यान, विमा पॉलिसीतून भाजपने सात कोटींचा ‘डाका’ मारल्याचा आरोप माजी महापौर योगेश बहल यांनी महासभेत केला होता.

याबाबत ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, महापालिका कर्मचा-यांसाठी लागू असलेली ‘धन्वंतरी स्वास्थ’ योजना बंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्याऐवजी विमा पॉलिसी राबविण्याची कार्यवाही चालू आहे.

आयुक्त दबावाखाली काम करतात, वेळप्रसंगी महापालिका बंद करणार- चिंचवडे

‘धन्वंतरी स्वास्थ’ योजनाच चालू ठेवण्याची सर्व कर्मचारी, संघटनेची मागणी आहे. त्यामुळे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी एकतर्फी निर्णय घेवू नये. धन्वंतरी योजनेमध्ये काही त्रुटी असतील. त्यात सुधारणा करावी. मधल्या कालावधीत आयुक्तांनी असाच प्रतिपुर्ती योजना लागू करण्याचा एकतर्फी निर्णय घेतला होता.

त्याला महासंघाने औद्योगिक न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावेळी आयुक्तांनी प्रतिपुर्ती योजना बंद करुन धन्वंतरी योजना चालू ठेवतो असे लिहून दिले होते.

परंतु, आता आयुक्तांनी विरोधी भूमिका घेवून धन्वंतरी योजना बंद करण्याचा प्रयोग चालू केला आहे. आमचा त्याला तीव्र विरोध आहे. आयुक्त कोणाच्या तरी दबावाखाली काम करत आहेत. या विरोधात आम्ही आंदोलन करणार आहोत. वेळ पडली तर महापालिका बंद करणार असल्याचा इशारा कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.