Pimpri News : संवाद हा परिवर्तनाचा सेतू – गिरीश प्रभुणे

एमपीसी न्यूज – ‘कोणी कितीही कट्टर विरोधक असला तरी संवाद हा परिवर्तनाचा सेतू असतो. त्यामुळे सर्व विचारधारांशी सुसंवाद साधला पाहिजे. मेकॉले आणि मार्क्सवाद यांनी आपल्या देशाची संस्कृती नष्ट केली आहे. समृद्ध भारताचा सुवर्णकाळ अनुभवायचा असेल तर आपले पारंपरिक ज्ञान, कलाकौशल्ये पुन्हा रुजवणे याला पर्याय नाही’ असे विचार पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ संचलित रवींद्रनाथ ठाकूर सार्वजनिक ग्रंथालयाच्या 36व्या वर्धापनदिनानिमित्त गिरीश प्रभुणे आणि अरुंधती प्रभुणे यांची रविवारी (दि.14) प्रकट मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे कार्याध्यक्ष भास्कर रिकामे, कार्यवाह प्रदीप पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी-चिंचवड जिल्हा सहसंघचालक विनोद बन्सल उपस्थित होते.

गिरीश प्रभुणे म्हणाले, ‘माणूस’ या नियतकालिकात तुटपुंज्या मानधनावर केलेले लेखन, दि.बा.मोकाशी, विजय तेंडुलकर अशा अनेक प्रतिभावंतांशी झालेली ओळख, त्यातून निमगाव म्हाळुंगे येथील प्रकल्पावर काम करण्याची मिळालेली संधी जीवनाला कलाटणी देणारी ठरली. समाजातील वंचितांमध्ये राहून केलेले काम आणि पुढे अतिशय नावारूपाला आलेल्या ‘यमगरवाडी’ प्रकल्पाचे अनुभव प्रभुणे यांनी यावेळी सांगितले.

2006 साली चापेकर वाड्याची उभारणी, तेथे पारधी मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणताना वाट्याला आलेली बदनामी सोसून पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् प्रकल्प उभा करून त्याची आजपर्यंतची वाटचाल त्यांनी उलघडून सांगितली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा निष्ठावान कार्यकर्ता असलो तरी संघाच्या कट्टर विरोधकांशी नेहमीच सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केला, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

अरुंधती प्रभुणे यांनी बालपणापासून मोठ्या कुटुंबात वावरल्याने शिक्षिकेची नोकरी करून प्रपंचातील कष्ट आनंदाने सहन केले, असे त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी यवतमाळ येथील ओंकार राष्ट्रदेव सार्वजनिक वाचनालय आणि ज्ञानसागर सार्वजनिक वाचनालय डाळिंब (ता. दौंड) येथील ग्रंथालयांना मान्यवरांच्या हस्ते ग्रंथदान करण्यात आले. त्यानंतर चित्रांवरून आशय व्यक्त करणाऱ्या ललित, कथा, काव्यलेखन स्पर्धेमधील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

ललितलेखनासाठी प्रथम क्रमांक माधवी पोतदार यांना देण्यात आला. द्वितीय क्रमांक वंदना गुर्जर, तृतीय क्रमांक पुष्पा नगरकर, उत्तेजनार्थ सुनंदा जप्तीवाले तसेच, कथालेखनमध्ये प्रथम क्रमांक माधुरी विधाटे, द्वितीय क्रमांक अर्चना वर्टीकर, तृतीय क्रमांक उल्का खळदकर, उत्तेजनार्थ जयश्री पाटील आणि काव्यलेखनसाठी प्रथम क्रमांक योगेश उगले, द्वितीय क्रमांक सुरेखा हिरवे, तृतीय क्रमांक सुरेश सेठ, उत्तेजनार्थ प्रकाश परदेशी यांना देण्यात आले.

रवींद्रनाथ ठाकूर ग्रंथालय आणि स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या संयोजनात सहकार्य केले. विनीत दाते यांनी सूत्रसंचालन केले. सतीश सखदेव यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.