Pimpri News: दिव्यांगांना मिळणार प्रमाणपत्राशिवाय पीएमपीएमएल बसपास

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएल बसमधून प्रवासासाठी महापालिकेतर्फे शहरातील दिव्यांगांना मोफत पास दिला जातो. त्यासाठी दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. सध्या कोरोनामुळे डॉक्टरांकडून दिव्यांगत्त्व तपासून प्रमाणपत्र दिले जात नसल्याने त्यांना पासचा लाभ घेता नाही. त्यांच्या सोयीसाठी प्रमाणपत्राशिवाय पास देण्याचा निर्णय पिंपरी – चिंचवड महापालिका स्थायी समिती सभेने घेतला आहे.

महापालिकेकडील नोंदीनुसार, नागर वस्ती विकास योजना विभागातर्फे 21 प्रकारच्या योजना दिव्यांगांसाठी राबविल्या जात आहेत. त्यांचा लाभ घेण्यासाठी शहरातील तीन हजार 725 दिव्यांग पात्र ठरले आहेत. आणखी सुमारे दोन हजार दिव्यांग असण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे सर्वच दिव्यांगांना पीएमपीएमएल प्रवासाचा पास देण्यात यावा. यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याचे स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे यांनी सांगितले.

दरम्यान, 2020-21 च्या आर्थिक वर्षात दिव्यांग कल्याणकारी योजनेअंतर्गत 21 उपयोजनांचा लाभ दिव्यांगाना मिळणार आहे. त्यासाठी 27 कोटी 16  लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्यातून पंडीत दिनदयाल उपाध्याय दिव्यांग पेन्शन योजनेसाठी आठ कोटी 50 लाख रुपयांची तरतूद आहे. आजपर्यंत सहा कोटी 90 लाख रुपये खर्च झाले आहेत. या योजनेतून दिव्यांगांना दरमहा दोन हजार रुपये अनुदान दिले जात आहेत. तीन हजार 725 जणांना आतापर्यंत 74 लाख 50 हजारांचे अनुदान वाटप झाले आहे. सध्या एक कोटी 59 लाख पाच हजार 560  रुपये तरतूद शिल्लक आहे. त्यात आणखी तरतूद करणे आवश्यक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.