Pimpri News:पवना धरणातून 4 वाजता पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा, जुलैमध्येच धरणात 85 टक्के पाणीसाठा

एमपीसी न्यूज – मागील आठ दिवस धुवांधार पाऊस झाल्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण यंदा जुलैमध्येच 85 टक्के भरले आहे. जुलैचा ‘ग्राफ’ पूर्ण झाला असून धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पवना धरणातून आज (गुरुवारी) दुपारी 4 वाजल्यापासून विद्युत जनित्राद्वारे 1400 क्युसेक व  सांडव्याद्वारे 2100 क्युसेक असा एकूण
3500 क्युसेक विसर्ग करण्यात येणार आहे. पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.

पवना धरणात 85 टक्के पाणीसाठा झाला आहे. हवामान अंदाजानुसार धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे धरणाच्या पातळीमध्ये वाढ होत आहे. धरणामध्ये होणारी पाण्याची आवक पाहता धरणाच्या सांडव्यावरुन आज दुपारी 4 वाजता पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे.

पवना धरणाच्या खालील बाजुस नदीतीराकडील सर्व गावातील नागरिकांनी दक्ष राहावे. नदी तीरावरील जनावरे, मोटारी, अवजारे व इतर सामुग्री त्वरीत सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावी. जेणेकरून कुठलीही जिवीत व वित्तहानी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.

‘एमपीसी न्यूज’शी बोलताना पवना धरणाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अन्वर तांबोळी म्हणाले, ”पवना धरणात 85 टक्के पाणीसाठा आहे. यंदा जुलैमध्येच धरण 85 टक्के भरले आहे. कोणत्या महिन्यात किती टक्के पाणी झाल्यावर पाण्याचा विसर्ग करायचा याचा ‘ग्राफ’ असतो.

जुलै महिन्यात 85 टक्के, ऑगस्टमध्ये 95 टक्के पाणीसाठा झाला. तर, धरणातून विसर्ग केला जातो. जुलैमध्ये 85 टक्के पाणीसाठा झाल्याने जुलैचा ग्राफ पूर्ण झाला आहे. त्यानुसार पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. दक्षता म्हणून थोडे पाणी सोडावे लागत आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.