Pimpri News: कोरोना काळातील वीजबीलात सवलत द्या; काँग्रेसची उर्जामंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज – कोरोना आणि लॉकडाउनचा फटका बसलेल्या एमएसएमई, व्यावसायिक, वाणिज्य ग्राहकांचे वीजबील पुर्णता माफ करावे, तसेच लाखो ग्राहकांना चक्रवाढ पध्दतीने आकारलेले दंडव्याज माफ करावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.

साठे यांनी उर्जामंत्री नितीन राऊत यांची आज (मंगळवारी) पुण्यात भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, जेष्ठ नेते गौतम आरकडे, सेवादलाचे मकर यादव, युवक काँग्रेसचे सरचिटणीस चंद्रशेखर जाधव आदी उपस्थित होते.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, कोरोना कोविड -19 या जागतिक महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी 22 मार्च 2020 पासून राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पुर्णता किंवा अंशता वारंवार लॉकडाऊन करण्यात येत आहे. आजही पुणे जिल्हा, पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड शहरात दुपारी चारनंतर लॉकडाऊन आणि संचारबंदी तर शनिवार, रविवार अत्यावश्यक सेवा वगळता पुर्णता लॉकडाऊन आहे.

लॉकडाऊनमुळे सर्वच उद्योग, व्यवसाय आर्थिक अडचणीत आले आहेत. छोट्या व्यावसायिकांबरोबरच एमएसएमई उद्योजकांचे उत्पन्न घटले आहे. उत्पादन, उत्पन्न बंद असतानाही महावितरणकडून किमान वीज वापराची बिले आकारण्यात आली आहेत. ही वीजबीले देखिल जे ग्राहक भरु शकले नाहीत अशा ग्राहकांना मासिक दोन टक्के चक्रवाढ पध्दतीने पुढील महिण्यांची वीजबीले आकारण्यात आली आहेत.

ज्या ग्राहकांची थकबाकी पाच हजार रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा ग्राहकांचा वीज पुरवठा कोणतीही पूर्व सुचना न देता गुंड प्रवृत्तीच्या ठेकेदारांकडून खंडीत करण्यात येत आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये वीज वितरण विभागाविषयी तीव्र नाराजी आहे.

या लॉकडाऊनमुळे सर्व सामान्य जनता, समाजातील सर्वच घटक आर्थिक टंचाईला सामोरे जात असताना मेटाकुटीला आले आहेत. व्यापारी, एमएसएमईसह घरगुती व व्यावसायिक, वाणिज्य वीजवापर करणारे सर्वच ग्राहक प्रचंड आर्थिक संकटात आले आहेत. त्याचा जास्त परिणाम प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष कामगार, अल्प उत्पन्न गटातील वर्गावर होत आहे. अशा ग्राहकांना कोरोना काळातील वीजबीलांबाबत दिलासा द्यावा. तसेच लाखो ग्राहकांना चक्रवाढ पध्दतीने आकारलेले दंडव्याज माफ करावे.

त्याबरोबर ज्या काळात शहरात पुर्णता लॉकडाऊन होते. त्या काळातील एमएसएमई, व्यावसायिक, वाणिज्य ग्राहकांचे वीजबील पुर्णता माफ करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.