Pimpri News: शासन आदेश नसताना महापालिकेत ठाण मांडलेल्या अजित पवार यांना कार्यमुक्त करा – संदीप वाघेरे

दीड वर्षे अधिकचा पदभार भूषवून शासनाची धूळफेक; कार्यमुक्त करून शासनाकडे परत पाठवा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्तपदाबाबत अजित पवार यांच्याकडे शासनाचा कोणताही आदेश नाही. त्यांच्याकडे कोणताही नियुक्ती आदेश नसताना केवळ आयुक्तांची मेहेरनजर असल्यामुळे पवार यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त म्हणून सर्व विभागांची जबाबदारी सोपवलेली आहे. पवार यांना शासन सेवेत परत पाठविण्यासाठी महापालिकेतून तत्काळ कार्यमुक्त करावे, अशी मागणी सत्ताधारी भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले की, नगर विकास विभागाकडील 24 जुलै 2017 रोजीच्या आदेशानुसार अतिरिक्त जिल्हाधिकारी अजित पवार यांच्याकडे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. त्यानंतर दि. 5 सप्टेंबर 2019 रोजीच्या महसूल व वन विभागाच्या शासन आदेशानुसार अजित पवार यांना अपर जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आलेली आहे.

या पदोन्नती आदेशामध्ये पवार यांची पदस्थापना जिल्हा जात पडताळणी समिती पुणे या रिक्त पदावर करण्यात आली आणि ते या पदावर रुजू झालेले आहेत. परंतु, या पदावर रूजू झाल्यानंतर पवार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून असलेल्या पदावर हक्क सोडलेला नाही.

तसेच त्यांना शासनामार्फत महापालिकेमध्ये राहण्याचे अथवा अतिरिक्त पदभार दिल्याचे कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने 9 सप्टेंबर 2019 रोजी पवार यांना अतिरिक्त आयुक्त पदावर प्रपत्र बढती द्यावी किंवा त्यांना अतिरिक्त आयुक्त पदाचा पदभार सोपवावा. याबाबत शासन स्तरावरून आदेश निर्गत करण्याची विनंती करण्यात आली होती.

तथापि, शासनाकडून त्याबाबत कोणताही आदेश अथवा खुलासा करण्यात आलेला नसतानासुद्धा पवार हे अद्यापही महापालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्यांच्याकडे कोणताही नियुक्ती आदेश नसताना केवळ आयुक्तांची मेहेरनजर असल्यामुळे पवार यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त म्हणून सर्व विभागांची जबाबदारी सोपवलेली आहे, असे निदर्शनास येत आहे. तसेच रिक्त असलेल्या अतिरिक्त आयुक्त 1 व अतिरिक्त आयुक्त 3 या दोन्ही पदांची जबाबदारी सुद्धा पवार यांच्यावरच सोपविलेली आहे.

शासनामार्फत पवार यांच्या पदोन्नती आदेशामध्ये, संबंधित अधिकारी यांनी पदोन्नतीने पदस्थापनेच्या पदावर रुजू होऊन सध्याच्या पदाचा कार्यभार संबंधित विभागीय आयुक्त / कार्यालय प्रमुखांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करून पदस्थापनेच्या पदावर रुजू व्हावे असे स्पष्ट निर्देश आहेत.

असे असतानासुद्धा आयुक्तांनी त्यांना कार्यमुक्त न करता शासनाकडे मार्गदर्शन मागविण्याचे कारण समजून येत नाही. इतकेच नसून त्यांच्याकडे सर्व महापालिकेचा कारभार आपण सोपवलेचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे पवार यांनी चालविलेल्या मनमानी कारभाराची अनेक उदाहरणे आहेत.

नुकतेच कोविड केअर सेंटरचे कोणतेही कामकाज न केल्याने स्पर्श हॉस्पिटलला 3.50 कोटीची बिले स्थायी समितीच्या मान्यतेने विना आदेश देण्याची किमया पवार यांनी साधली आहे. अशी अनेक कामे पवार यांनी ठेकेदाराशी संगनमत करून अधिकाऱ्यांना धारेवर धरून करून घेतलेली आहेत.

आयुक्तांना देखील या सर्व कायदेशीर बाबी ठाऊक असून ते पवार यांना पाठीशी घालण्याचे शौर्य का दाखवीत आहेत, ही देखील एक पडताळणी करण्याची बाब आहे. त्यामुळे कोणताही शासन आदेश नसताना पवार यांची महापालिकेमध्ये असलेली नियुक्ती रद्द करून त्यांना तत्काळ शासन सेवेत परत पाठविण्यासाठी कार्यमुक्त करावे.

तसेच महापालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्तांनी चालविलेला कारभार त्वरित थांबवा. या प्रकरणामुळे सत्ताधारी पक्षाची बदनामी होऊन महापालिकेमध्ये सुरू असलेला गैरकारभार चव्हाट्यावर येत असल्याचे निदर्शनास येत आहे. या प्रकरणाची त्वरित चौकशी करून तात्काळ खुलासा करण्यात यावा अशी मागणी नगरसेवक वाघेरे पत्राद्वारे केली आहे.

याबाबत बोलताना संदीप वाघेरे म्हणाले की, पवार यांच्याकडील जिल्हा जातपडताळणी समिती पुणे अपर जिल्हाधिकारी पदाचा मूळ पदभार आहे. परंतु, पवार हे दिवसभर पूर्ण वेळ पिंपरी-चिंचवड महापालिकेतच ठाण मांडून असतात. तर, मग ते जात पडताळणी अपर जिल्हाधिकारी म्हणून कधी काम करतात, असा माझ्या सारख्या लोकप्रतिनिधी समोर प्रश्न आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.