Pimpri News : शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या निवडीवरून शहरातील काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते कैलास कदम यांची नुकतीच पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती झाली. मात्र या नियुक्तीवरून शहरातील काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे बघायला मिळत आहे. नाराज असलेल्या ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज (रविवारी, दि. 10) प्राधिकरण येथे एकत्र येत बैठक घेतली.

प्रदेश काँग्रेसचे सचिव आणि पिंपरी चिंचवडचे माजी शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या समवेत झालेल्या बैठकीसाठी माजी महापौर कवीचंद भाट, माजी प्रदेशाध्यक्षा श्यामला सोनवणे, अखिल भारतीय काँग्रेसच्या सदस्या माजी नगरसेविका निगार बारस्कर पि.चि.महिला काँग्रेसच्या अध्यक्षा गिरीजा कुदळे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती विष्णुपंत नेवाळे, पिंपरी ब्लॉगचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, चिंचवड ब्लॉगचे अध्यक्ष परशुराम गुंजाळ, ओबीसी सेलचे किशोर कळसकर, मायनॉरिटी सेलचे शहाबुद्दीन शेख, महाराष्ट्र युवकचे सरचिटणीस मयूर जयस्वाल आदि उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदाचा 11 महिन्यांपूर्वी सचिन साठे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर या पदावर कोणाचीही नियुक्ती करण्यात आली नव्हती. 11 महिन्यानंतर नुकतीच शहराध्यक्ष पदावर माजी विरोधी कैलास कदम यांची नियुक्ती करण्यात आली. त्या निवडीला काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला आहे. या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आणि खदखद आहे. कैलास कदम यांचा पूर्वईतिहास पाहता ते पिंपरी चिंचवड शहराला गतवैभव प्राप्त करून देतील असा विश्वास आम्हाला वाटत नाही, असा सूर या बैठकीत अळवण्यात आला.

माजी शहराध्यक्ष, प्रदेश सचिव  सचिन साठे यांना याबाबत विचारले असता त्यांनी बैठक झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. तसेच या बैठकीत पक्षातील ज्येष्ठ मंडळी कदम यांच्या निवडीवरून नाराज आहेत. त्यांनी त्यांची खदखद बैठकीत व्यक्त केली असल्याचे साठे यांनी सांगितले.

काँग्रेस पक्षातील शहरातील ज्येष्ठ लोकांनी या बैठकीत काही गोष्टी मांडल्या आहेत. त्या गोष्टी प्रदेश पातळीवर सांगितल्या जातील. पक्षाच्या व्यासपीठावर त्याचा विचार विनिमय करणार असून काँग्रेस पक्षातील शहरातील ज्येष्ठ मंडळी आणि नूतन अध्यक्ष कैलास कदम यांना एकत्र बसवून ज्येष्ठांची नाराजी दूर केली जाईल, असे माजी शहराध्यक्ष सचिन साठे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.