Pimpri News : होप फाऊंडेशनच्या वतीने दत्तक मुलांना भेटवस्तू व शैक्षणिक साहित्य वाटप

एमपीसी न्यूज – होप फाऊंडेशनच्या वतीने दत्तक घेतलेल्या 20 मुलांना भेटवस्तू व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. पोलीस उपायुक्त मंचक इप्पर व निगडी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या हस्ते या वस्तूंचे वाटप करण्यात आले.

होप फाऊंडेशनचे पुणे विभाग प्रमुख विनायक खोत यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून 20 दत्तक मुलांना सकस आहाराबरोबर भेटवस्तू व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी फाऊंडेशनच्या कामाचा आढावा घेत त्यांचे कौतुक केले.

होप फाउंडेशन ही संस्था गेली दहा वर्षे पश्चिम महाराष्ट्रात समाजकार्यासाठी पुढाकार घेत आहे. मागील चार वर्षापासून या संस्थेने एच. आय. व्ही बाधित लहान मुलांच्या जडणघडणीचा विडा उचलला आहे.

ज्या मुलांचे आई-वडील या आजाराचे बळी पडले व या मुलांच्या मायेचे छत्र हरविले अश्या 100 हून अधिक मुलांना संस्थेमार्फत पौष्टिक आहार व शैक्षणिक साहित्य दरमहा दिले जाते. हे कार्य कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमधून सुरू झाले. ते आता इचलकरंजी, कोल्हापूर शहर, बारामती व पुण्यापर्यंत पोहचलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.