Pimpri News: कोरोना काळातही पालिकेला दिवाळी बोनस !

पंधराव्या वित्त आयोगाचा 23 कोटींचा पहिला हप्ता मंजूरपंधराव्या वित्त आयोगाचा 23 कोटींचा पहिला हप्ता मंजूर

एमपीसी न्यूज – कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेला केंद्र, राज्य सरकारने दिवाळी बोनस दिला आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहर गटात (मिलियन सिटीझ) पिंपरी पालिकेला 22 कोटी 99 लाख 32 हजार 746 रुपयांचा पहिला हप्ता मंजूर झाला आहे. पाणी पुरवठा व व्यवस्थापन सुधारणा आणि प्रभावी घनकचरा व्यवस्थापन यासाठी हे अनुदान देण्यात आले आहे.

पंधराव्या वित्त आयोगाच्या सन 2020-21 करिता पहिला अहवाल आणि केंद्र सरकारचे स्पष्टीकरणात्मक ज्ञापन प्राप्त झाले आहे. त्याअनुषंगाने मिलियन प्लस सिटीझ गटाकरिता पाणी पुरवठा व व्यवस्थापन सुधारणा आणि प्रभावी घनकचरा व्यवस्थापन यासाठीचे अनुदान मिळाले आहे. 396 कोटी 50 लाख इतके अनुदान प्राप्त झाले आहे. हे अनुदान स्थानिक स्वराज्य संस्थाना वितरीत करण्याची बाब सरकारच्या विचाराधीन होती.

त्यामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेला 22 कोटी 99 लाख 32 हजार 746 रुपये पहिला हप्ता मंजूर झाला आहे. कोरोना महामारीमुळे पालिकेचे उत्पन्न घटले आहे. मागीलवर्षीपेक्षा मालमत्ता कर, बांधकाम परवानगीतून अतिशय कमी उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे पालिका आर्थिक संकटात असताना पंधराव्या वित्त आयोगाचा पहिला हप्त मंजूर झाल्याने आर्थिक दिलासा मिळाला आहे.

शेजारील पुणे महापालिकेला 41 कोटी 46 लाख 22 हजार 284 रुपये, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड 95 लाख 59 हजार 474 रुपये, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाला 65 लाख 16 हजार 56 रुपये आणि खडकी कॅन्टोन्मेंटला 93 लाख 69 हजार 167 रुपयांचा पहिला हप्ता मंजूर झाला आहे. कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाला यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.