Pimpri News: दिवाळी खरेदीच्या गर्दीची पालिकेला धास्ती

एमपीसी न्यूज – दोन दिवसांवर आलेल्या दिवाळी सणाच्या खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये पिंपरी-चिंचवडकरांची झुंबड उडाली आहे. ही गर्दी पाहून महापालिका प्रशासनाने धास्ती घेतली आहे. आता कुठे कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे. गर्दीमुळे दिवाळीनंतर शहरातील रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होण्याची भीती व्यक्त करत नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

दिवाळीला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडताना दिसत आहेत. पिंपरी कॅम्प, मोठ-मोठे मॉल, डी-मार्ट, बिग-बाजारमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी होताना दिसून येत आहे. नागरिकांकडून नियमांचे पालन केले जात नाही. सुरक्षित अंतराचा सर्वांना विसर पडला आहे. मास्क घातलेला दिसून येत नाही. ही गर्दी धोक्याची घंटा मानली जात आहे.

गणेशोत्सावत नागरिकांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन झाले. काळजी घेतली नाही. परिणामी, गणेशोत्सवानंतर शहरातील रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली. ती वाढ पंधरा दिवस कायम होती. त्यापार्श्वभूमीवर नागरिकांनी दिवाळी या सणात काळजी घेण्याचे आवाहन पालिकेकडून वारंवार केले जात आहे. पण, नागरिक गांभीर्याने घेताना दिसून येत आहेत.

खरेदीला मोठ्या संख्येने बाहेर पडून एक प्रकारे कोरोनाला आमंत्रणच देत असल्याचे दिसत आहे. गर्दीची पालिका प्रशासनाने मात्र धास्ती घेतली आहे. दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येईल. असे सांगितले जात आहे. दिवाळीत नागरिकांनी खबरदारी नाही घेतल्यास रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात येताना दिसत आहे. आठ महिन्यानंतर रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यात पालिकेला यश आले आहे. चालू आठवड्यात रुग्णसंख्या शंभरच्या आतमध्ये आली आहे. रुग्णसंख्या घटल्याने, कोरोनाचा विळखा सैल झाल्याने मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. गेल्या सात महिन्यानंतर रविवारी शहरातील एकाचाही कोरोनामुळे मृत्यू झाला नव्हता. हे आशादायक चित्र आहे.

पालिकेची मास्कची कारवाई थंडावली!

मास्कविना फिरणा-यांवर पालिकेकडून धडक कारवाई केली जात होती. मास्क न घालणा-यांकडून मोठा दंडही वसूल केला आहे. पण, सध्या मास्कची कारवाई थंडावल्याचे दिसून येत आहे. आता ख-या अर्थाने मास्क न घालणा-यांवर कारवाईची गरज आहे. अनेक नागरिक खरेदीसाठी बाहेर पडताना मास्कविना असल्याचे दिसते. त्यामुळे मास्क कारवाई राबविण्याची आवश्यकता आहे.

कोरोना गेला नाही, नागरिकांनो गर्दी टाळा – अतिरिक्त आयुक्त पाटील

दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. कोरोना आपल्यातून गेला नाही. आजही शहरात कोरोनाचे रुग्ण आहेत. गर्दीच्या ठिकाणी संक्रमण होण्याचा धोका जास्त आहे. नागरिकांनी गर्दी टाळावी. बाहेर पडताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. मास्कचा वापर करावा, सॅनिटाझर वापर करावा. सुरक्षित अंतर पाळावे, असे आवाहन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.