Pimpri News : महापालिकेच्या साडेआठ हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; 8.33 टक्के बोनस, 20 हजार सानुग्रह अनुदान

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचाऱ्यांना 8.33 टक्के दिवाळी बोनस आणि 20 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. कर्मचारी महासंघ आणि आयुक्त राजेश पाटील यांनी चर्चा करुन हा निर्णय घेतला. त्यामुळे साडेआठ हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. याबाबतची माहिती महापौर उषा ढोरे, आयुक्त राजेश पाटील यांनी आज (मंगळवारी) पत्रकार परिषदेत दिली.

उपमहापौर हिराबाई घुले, स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, सरचिटणीस सुप्रिया सुरगुडे आदी उपस्थित होते. पिंपरी – चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघ आणि पिंपरी – चिंचवड महापालिका यांच्यात पंचवार्षिक वेतन करार झाला होता. यावर्षी करार संपला. त्यामुळे नव्याने पाच वर्षांसाठी करार करण्यात आला. पुढील पाच वर्षे म्हणजेच 2020-21 ते 2024-25 पर्यंत हा करार असणार आहे. कर्मचारी महासंघाने 30 हजार रुपये पर्यंत सानुग्रह अनुदानाची मागणी केली होती. चर्चेअंती पाच हजार रुपयांनी सानुग्रह अनुदानात वाढ करण्यात आली. 8.33 टक्के दिवाळी बोनस आणि 20 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

कोरोनामुळे महापालिकेचे उत्पन्न घटले आहे. कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळेल की नाही याबाबत चर्चा होती.

या पार्श्वभूमीवर कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांची सोमवारी (दि.27) भेट घेतली. कोरोना संकटाच्या काळातील कर्मचाऱ्यांचे योगदान आणि शहराच्या विकासातील योगदान लक्षात घेता चर्चेअंती आयुक्तांनी 8.33 टक्के बोनस आणि 20 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यास मान्यता दिली.

महापालिका आयुक्त राजेश पाटील म्हणाले, “शहराचा दर्जा आपल्याला उंचवायचा आहे. प्रशासन, कर्मचारी म्हणून ही जबाबदारी आपली आहे. चांगले काम करत रहा. आम्ही प्रोत्साहन देऊ. कर्तव्य आणि जबाबदारी ठेवून कामाप्रती प्रामाणिक राहा. प्रशासन तुमचे मनोधैर्य नक्की वाढवण्याचा प्रयत्न करणार आहेत. ज्या दिवशी कर्मचारी निवृत्त होतील. त्याच दिवशी त्यांना त्यांच्या सेवेचा पूर्ण लाभ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या देय रकमेसाठी त्यांना कोणत्याही चकरा माराव्या लागणार नाहीत. याची दक्षता घेतली जाणार आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.