Pimpri corona news: 18 वर्षापुढील कोरोना लसीकरण गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये करा- युवक काँग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज – कोरोना प्रतिबंधक लसीचा पुढील टप्पा 1 मे पासून सूरु होत आहे. या टप्प्यात 18 वर्षांपुढील सर्वांना लस देण्यात येणार आहे. हे लसीकरण गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये घेण्यात यावे, अशी मागणी युवक काँग्रेसने केली आहे.

याबाबत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस मयुर जयस्वाल , पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे सरचिटणीस चंद्रशेखर जाधव , गौरव चौधरी यांनी महापालिका आयुक राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात जास्तीत जास्त लसीकरण करण्यात येत आहे.

यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये ज्येष्ठ नागरिक व दुसऱ्या टप्प्यात वय 45 वर्षापुढील नागरिकांना लस देण्यात आली. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण हे 18 वर्षांपुढील सर्वांना देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

कोरोनाच्या लढ्यामध्ये लस हे सर्वात प्रभावी शस्त्र आहे. सरकार व प्रशासनाच्या वतीने जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये महापालिकेच्या वतीने विविध ठिकाणी सुरु केलेल्या लसीकरण केंद्रावर हवा तेवढा प्रतिसाद मिळालेला नाही. यामध्ये मुख्य कारण लसीकरण केंद्रावर नागरिक जास्त गर्दी करीत असतील असा समज झाला आहे.

कोरोनाच्या भीतीमुळे तसेच ज्येष्ठ नागरिक हे जास्त वेळ बसू शकत नसल्याने अनेकजण या केंद्रावर जाणे टाळत आहेत. परिणामी अनेक ठिकाणी लसीकरण कमी झाले व काही ठिकाणी केंद्र बंद करण्याची वेळ आली.

1 मे रोजी सुरू होणारे लसीकरण हे गृहनिर्माण सोसायटीच्या कम्युनिटी हॉल, ऑफिसमध्ये योग्य नियोजन करून घेतल्यास, सर्वच नागरिकांना सोयीस्कर होईल. त्यास जास्तीत जास्त प्रतिसाद मिळेल परिणामी शासनाचे उद्दिष्ट पुर्ण होण्यास मदत होईल. तसेच सोसायटीचे मदतनीस व स्वयंसेवकांमुळे प्रशासनावरील ताण देखील कमी होणार आहे. त्यामुळे गृहनिर्माण सोसायटीमध्ये लसीकरण सुरू करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.