Pimpri news: चिंताजनक रुग्णवाढ; शहरात टाळेबंदी लावा – आमदार अण्णा बनसोडे

एमपीसी न्यूज – गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवडसह राज्यभरात सातत्याने कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. परिणामी वैद्यकीय यंत्रणेवर कमालीचा ताण येत आहे. शहरात लसीची कमतरता आहे. या परिस्थितीत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने वेळेप्रसंगी कठोर निर्णय घ्यावे. कारण लोकांचा जीव महत्वाचा आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये कठोर निर्णय घेऊन टाळेबंदी करण्यात यावी. उद्योग, व्यवसाय, उत्पन्नापेक्षा जनतेचा जीव महत्वाचा आहे. यातून होणारी आर्थिक हानी भरून काढता येईल. मात्र जीवित हानी परवडणार नाही. त्यामुळे कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पिंपरी-चिंचवडमध्ये कठोर निर्बंधासह टाळेबंदी लावावी, असे मत आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केले आहे.

आमदार बनसोडे यांनी म्हटले आहे की, कोरोनाने शहरात अक्राळविक्राळ रुप धारण केले आहे. दिवसेंदिवस होणारी रुग्णवाढ व मृत्यूचे प्रमाण हा चिंतेचा विषय आहे. तसेच शहरात व्हेंटिलेटर व ऑक्सिजन ची कमतरता आहे रॅमिडिवीर इंजेक्शनचा तुटवडा आहे. वैद्यकीय यंत्रणेवर प्रचंड तणाव आहे. शहराची परिस्थिती बिकट होण्याआधी राज्यशासनाने व पालिका आयुक्त यांनी त्वरित निर्णय घेऊन टाळेबंदी करावी. प्रत्येकजण प्रामाणिकपणे व मनापासून शिस्त पाळत नाहीत, तोपर्यंत हे संकट आटोक्यात येणार नाही. त्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलून कठोर निर्बंध लावावेत. लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यवसायाचे नुकसान होईल. मात्र लोकांचे जीवही महत्त्वाचे आहेत. कारण मागील वर्षापेक्षा कोरोनाची लाट ही भयंकर आहे. लोकांचे व्यवसाय ठप्प होतील. परंतु, सध्या लोकांचे जीव वाचवण्यास प्राधान्य द्यायला हवे. अशीही चिंता आमदार बनसोडे यांनी व्यक्त केली आहे.

कोरोना महामारीचे महापरिणाम हे आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक स्वरुपात झाले आहेत. हे परिणाम वैयक्तिक, व्यावसायिक नव्हे, तर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संदर्भातही दिसून येत आहेत. हे सारे परिणाम विविध स्वरूपात दीर्घकालीन स्वरुपाचे आहेत. या व्यापक परिणामांवर उपाययोजना करताना लघुउद्योजकांनी परिस्थितीचे सार्वत्रिक भाव ठेवून अष्टावधानी भूमिका स्वीकारणे आवश्यक आहे. सध्या होणारे नुकसान सहन करण्याची तयारी ठेवावी. कारण टाळेबंदीमुळे तरी लोकांना शिस्त लागून अनेकांचे जीव वाचतील.

कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे, ही राजकारण करण्याची वेळ नाही, संघटना, स्वयंसेवक, गणपती मंडळानी जबाबदारी ओळखून गरजू नागरिकांना मदत करावी, तरुणांनी विनाकारण घराबाहेर पडून आपल्या घरातील सदस्यांचा जीव धोक्यात आणू नये, कारण बऱ्याच तरुणांना काही त्रास होत नाही परंतु ते कॅरियर बनवून घरातील सदस्यांना बाधित करत आहेत म्हणून तरुणांना माझे आव्हान आहे जबाबदारीने वागून कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आमदार अण्णा बनसोडे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.