Pimpri news: खुल्या बाजारातून वीजमीटर खरेदी करु नका; वीजग्राहकांना महावितरणचे आवाहन

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वीजमीटरचा तुटवडा दूर करण्यासाठी महावितरणने पुरवठादारांना 18 लाख सिंगल फेज तर 1 लाख 70 हजार थ्री फेज नवीन वीजमीटर पुरवठायाचे आदेश दिले आहेत. मार्च अखेरपर्यंत 3 लाख 80 हजार वीजमीटरचा पुरवठा होणार आहे. पर्याप्त मीटर उपलब्ध करून देण्यात आल्याने ग्राहकांनी खुल्या बाजारातून वीजमीटर खरेदी करु नयेत, असे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरणकडून दरवर्षी सुमारे 8 ते 9 लाख नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात येतात. मार्च 2020 नंतर कोरोना प्रादुर्भाव आणि ‘लॉकडाऊन’मुळे नवीन वीजमीटरची उपलब्धता काही प्रमाणात कमी झाली होती. तरीही जून 2020 नंतर महावितरणतर्फे 6 लाख 50 हजार 523 सिंगल फेज तर 62 हजार 55 थ्री फेज ग्राहकांना वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.

मीटरअभावी ग्राहकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून उपलब्ध वीजमीटर तातडीने ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश महावितरणच्या मुख्य कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आले आहेत.

महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी क्षेत्रीय कार्यालयांमध्ये वीजमीटरच्या उपलब्धतेसाठी एका वर्षापेक्षा अधिक कालावधीचे नियोजन केले आहे. कोणत्याही परिस्थितीत वीजमीटरची कमतरता जाणवणार नाही, यासाठी महावितरणतर्फे उपाययोजना करण्यात आली आहे.

सद्यस्थितीत महावितरणच्या पुणे प्रादेशिक कार्यालयाकडे 38 हजार वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. महावितरणला दररोज सुमारे 8 ते 10 हजार नवीन वीजमीटरचा पुरवठा सुरु झाला असून मार्चअखेर सिंगल फेजचे 3 लाख 20 हजार आणि थ्री फेजचे 60 हजार नवीन मीटर उपलब्ध होणार असल्याचे जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.