Pimpri Corona News: ‘जम्बो’बाबत तक्रारी येवू देऊ नका, त्रुटी दूर करा : श्रीरंग बारणे

आकुर्डी, थेरगाव रुग्णालय तत्काळ सुरू करा; बेडची संख्या वाढविण्याची सूचना

खासदार बारणे यांनी केली जम्बो कोविड रुग्णालयाची  पाहणी

एमपीसी न्यूज  – जम्बो कोविड सेंटरबाबत तक्रारी येऊ देऊ नका, रुग्णांवर व्यवस्थित उपचार करावेत. ज्या काही त्रुटी असतील  त्या तत्काळ दूर कराव्यात, अशा सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी कोविड रुग्णालय प्रशासनाला केल्या.

शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे बेडची संख्या वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेने उभारलेले आकुर्डी आणि थेरगाव रुग्णालय तत्काळ सुरू करावे. आरोग्य व्यवस्था, प्रशासनावर ताण आहे. राज्य सरकार कोरोनाची परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळत असून महापालिका प्रशासनही झोकून देऊन काम करत आहे. लोकप्रतिनिधी म्हणून सर्व सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी प्रशासनाला दिली.

नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियममधील जम्बो कोविड सेंटरला खासदार बारणे यांनी आज (मंगळवारी) भेट दिली. जम्बो सेंटरची संपूर्ण माहिती घेतली. उपचार घेत असलेल्या रुग्णांची  परिस्थिती काय आहे याचीही त्यांनी  सविस्तर माहिती घेतली.

  आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जम्बोचे समनव्यक असलेले सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, नोडल ऑफिसर सुनील पवार, जम्बोचे व्यवस्थापक डॉ. संग्राम कपाले, डॉ. प्रिती व्हिक्टर, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, माजी शहरप्रमुख योगेश बाबर, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, शहरातील खासगी तसेच  महापालिका हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमरता भासू देऊ नका, ऑक्सिजन वाया जाऊ देऊ नका, गरजू  रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन मिळाला पाहिजे. महापालिकेने 250 च्या पुढे खासगी रुग्णालयांना कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी दिली आहे. त्यांच्यावर नियंत्रण ठेवावे. खासगी रुग्णालयातील बिलांच्या  तक्रारी निकाली काढाव्यात. रेमडेसिवीर  इंजेक्शनचा कोटा जिल्हाधिका-यांमार्फत येत आहे. यात  काही प्रमाणात तुटवडा असून तो दूर करावा.

शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता बेड वाढविण्याची आवश्यकता आहे. आकुर्डी येथे 300 आणि थेरगाव रुग्णालयात 300 अशी 600 बेडची क्षमता असलेली कोविड रुग्णालये सुरू करावीत. ऑक्सिजन व्यवस्थेचे काम पूर्ण करून येत्या आठ दिवसांत रुग्णालये सुरु करावीत, अशी सूचनाही खासदार बारणे यांनी केली.

रुग्णांच्या नातेवाईकांशी साधला सवांद

महापालिकेच्या वतीने रुग्णांना दिले जाणारे जेवण व्यवस्थित असते का, रुग्णांशी बोलून ते दिले जाते का, रुग्णांच्या प्रकृतीची माहिती दिली जाते का, जेवण चांगले असते का ?  याची विचारणा खासदार बारणे यांनी नातेवाईकांना केली. त्यावर रुग्णालयात योग्य सोय असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

त्यानंतर खासदार बारणे यांनी  कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन डॉक्टरांशी चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आरोग्य व्यवस्था, प्रशासनावर ताण आहे. लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला साथ द्यावी. राज्य सरकार कोरोनाची परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळत आहे. महापालिका प्रशासन झोकून देऊन काम करत आहे. नागरिकांनी सहकार्य करावे. गर्दी टाळावी.  नियमांचे पालन करावे, असे आवाहन खासदार बारणे यांनी केले.

जम्बोत 750 बेडची क्षमता आहे. ऑक्सिजन 600, आयसीयू 60, एचयूडीचे 90 आणि व्हेंटिलेटरचे 40 बेड आहेत. 65 टक्के रुग्ण जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून येतात. ऑटो क्लस्टरमध्ये 150 बेडची सुविधा आहे. वायसीएममध्येही कोविड रुग्णांवर उपचार केला जातात.
ऑक्सिजनबाबत राज्यातच तुटवडा असून शहरात पॅनिक होण्याची परिस्थिती नाही.

खासगी रुग्णालयातील बिलांची तपासणी करण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. नोडल अधिकारी नियुक्त केले असल्याची माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी खासदार बारणे यांना दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.