Pimpri News : डॉ. अमरसिंह निकम यांचा ‘होमिओपॅथिक हॉस्पिटलचे जनक’ या उपाधीने सन्मान

एमपीसी न्यूज – ‘टीम मिशन होमिओपॅथी’ या होमिओपॅथीतज्ज्ञांच्या संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा व स्वामी होमिओपॅथिक हॉस्पिटल अँड हिलिंग सेंटरच्या तृतीय वर्धापनदिनानिमित्त अहमदनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात पिंपरी-चिंचवडमधील नामवंत होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. अमरसिंह दत्तात्रय निकम यांना ‘होमिओपॅथिक हॉस्पिटलचे जनक’ ही उपाधी प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

डॉ. अमरसिंह निकम यांनी 26 वर्षांपूर्वी पिंपरीगावात आदित्य होमिओपॅथिक हॉस्पिटल अँड हिलिंग सेंटर हे पहिले होमिओपॅथिक हॉस्पिटल सुरू करून इतिहास घडविला आहे. डॉ. निकम यांनी होमिओपॅथीच्या क्षेत्रात आतापर्यंत केलेले उल्लेखनीय कार्य व रुग्णसेवा यांचा सन्मान करण्यासाठी त्यांना ही उपाधी व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

जर्मनीचे डॉ. सॅम्युअल हॅनिमन हे होमिओपॅथी या वैद्यकशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात. डॉ. निकम यांनी डॉ. हॅनिमन यांच्या सर्व होमिओपॅथिक सिद्धांतांचे अचूक व योग्य पद्धतीने अवलंबन करून सुरूवातीला 14 वर्षे बाह्यरुग्ण पद्धतीने रुग्णसेवा केली. त्या अनुभवाच्या जोरावर डॉ. निकम यांनी प्रथम 1995 मध्ये पिंपरीत चार खाटांचे होमिओपॅथिक हॉस्पिटल सुरू केले. ते गेल्या पाच-सहा वर्षांपासून 100 खाटांच्या भव्य हॉस्पिटलमध्ये रुपांतरित झाले आहे.

या भव्य रुग्णालयाचे उद्घाटन महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर केंद्रीय मंत्री सुधीर नाईक यांच्या उपस्थितीत झाले होते.

डॉ. निकम यांनी गेल्या 40 वर्षांत अनेक रुग्णांना दुर्धर आजारातून बरे करून नवीन दीर्घायुष्य दिले आहे. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना आतापर्यंत अनेक राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. निकम यांच्या सर्व विद्यार्थ्यांनी ‘टीम मिशन होमिओपॅथी’च्या माध्यमातून गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून डॉ. निकम यांना ‘होमिओपॅथिक हॉस्पिटलचे जनक’ ही उपाधी प्रदान त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

या समारंभातच होमिओपॅथी विद्यार्थ्यांसाठी डॉ. निकम यांचे मार्गदर्शनपर व्याख्यानही आयोजित करण्यात आले होते. सुमारे 50 विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला. त्यावेळी अहमदनगरचे डॉ. साईनाथ चिंता, कोपरगावचे डॉ. शीतलकुमार सोनवणे, नाशिकचे डॉ. मुकेश मुसळे, पुण्याच्या डॉ. राखी मुनोत आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या नियोजनासाठी डॉ. संकेत लांडे, डॉ. अनिल नवथर, डॉ. रुपेश सोनवणे, डॉ. गणेश वाक्चौरे, डॉ. गणपत जाधव आदींनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नीलेश जंगले व डॉ. सुहासिनी चव्हाण यांनी केले तर डॉ. सुनीता चिंता आणि डॉ. रुपाली जंगले यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.