Pimpri News : डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचा बारावा पदवी प्रदान कार्यक्रम मंगळवारी

एमपीसी न्यूज – डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचा बारावा पदवीप्रदान समारंभ मंगळवार (दि.29) दुपारी 12 वा आयोजित करण्यात आला आहे. कोरोना संसर्ग लक्षात घेता हा समारंभ मोजक्याच मान्यवरांच्या व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पिंपरी येथील डॉ. डी . वाय. पाटील विद्यापीठाच्या सभागृहात पार पडणार असून इतर मान्यवर व विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने सहभागी होतील.

या कार्यक्रमाला नवी दिल्लीच्या विश्व विद्यालय अनुदान आयोगाचे अध्यक्ष डॉ. प्रा. धीरेंद्र पाल सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. खगोलशास्त्रज्ञ व पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त डॉ. प्रा. जयंत नारळीकर (एमिरूट्स प्राध्यपक, इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी ॲन्ड ॲस्ट्रोफिजिक्स) व प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ प्रा. राम ताकवले – (मुख्य मार्गदर्शक, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित, माजी कुलगुरू- पुणे विदयापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, नवीदिल्ली) या दोन मान्यवरांना विद्यापीठाकडून डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी देऊन गौरविण्यात येणार आहे.

या समारंभात विद्यापीठाच्या विविध परीक्षांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या 22 विद्यार्थ्यांना या वेळी सुवर्ण पदके देऊन कार्यक्रमात सन्मानित करण्यात येईल. विविध विद्याशाखेतील 1577 स्नातकांना पदवी प्रदान करण्यात येत असून यामध्ये 14 विद्यावाचस्पती (पीएच.डी.), 874 पद्युत्तर पदवी, 679 पदवी व 10 पदविका या अभ्यासक्रमाचा यात समावेश आहे.

डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती मा. डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, कुलगुरू मा. डॉ. एन. जे. पवार, सचिव मा.डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त डॉ. स्मिता जाधव व कोषाध्यक्ष डॉ. यशराज पाटील यांच्या उपस्थितीत हा समारंभ संप्पन्न होणार आहे.

कोरोना प्रादुर्भाव आणि निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ यंदा आभासी पद्धतीने (ऑनलाईन) होणार आहे या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी थेट प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले असून
https://www.dpu.edu.in/live व https://www.facebook.com/dpu.in
या संकेतस्थळांना भेट द्यावी अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव मा. डॉ. ए. एन. सूर्यकर यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.