Pimpri News: पवना, इंद्रायणी नदी पात्रातील जलपर्णी काढा – सचिन भोसले

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणा-या पवना आणि इंद्रायणी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचली आहे. त्यामुळे नदीकाठी राहणा-या नागरिकांना दुर्गंधी, डासांचा त्रास होत आहे. या दोनही नद्यांच्या पात्रातील जलपर्णी तत्काळ काढावी, अशी मागणी शिवसेना नगरसेवक ॲड. सचिन भोसले यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात नगरसेवक भोसले यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात पवना, इंद्रायणी या दोन नद्या आहेत. दोन्ही नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी झाली आहे. त्यामुळे पाण्याचे प्रदुषण होत आहे. नदीकाठी राहणा-या नागरिकांना दुर्गंधी, डासांचा त्रास होत आहे.

अनेक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत महासभेत देखील प्रशासनाला कल्पना दिली. परंतु, त्यावर कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. आंदोलनाचा इशाराही देवूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.

नदीतील जलपर्णी तत्काळ काढावी. कोणत्याही नागरिकाला बाधा झाली तर त्यास प्रशासनास जबाबदार धरले जाईल, असेही नगरसेवक भोसले यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.