Pimpri News: महापालिकेतर्फे सारथीमध्ये ‘ई-कॉमर्स’ सुविधा; व्यापारी व ग्राहकांमध्ये साधणार ‘दुवा’

एमपीसी न्यूज – शहराच्या विकासाला चालना मिळावी आणि व्यापारी व ग्राहक यांच्या दरम्यान दुवा साधला जावा, यासाठी पीसीएमसी स्मार्ट सारथीमध्ये ई-कॉमर्स (मर्चंट मोड्यूल)ची सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना ऑनलाईन खरेदीची सुविधा उपलब्ध होऊन सवलतींचा लाभ मिळेल. तसेच व्यापारी बांधवांनादेखील व्यवसायवृद्धीसाठी याचा उपयोग होईल. या ई-कॉमर्सचे (मर्चंट मोड्यूल) महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले.

स्मार्ट सिटीचे संचालक नामदेव ढाके, राजू मिसाळ, सचिन चिखले, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डीकर, सह-मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण अधिकारी, कर्मचारी व व्यापारी उपस्थित होते.

सध्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. तसेच ग्राहकदेखील वस्तूंची खरेदी करण्यासाठी ऑनलाईन पर्यायाचा शोध घेत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या ‘व्होकल फॉर लोकल’ या धोरणाला अनुसरून विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. कोरोनाकाळात पीसीएमसी स्मार्ट सारथी घरोघरी पोहोचला आहे.

पीसीएमसी स्मार्ट सारथी सुविधा विविध भाषांमध्ये उपलब्ध करण्यात यावी. शहरातील सर्व स्तरांमधील व्यापाऱ्यांना पीसीएमसी स्मार्ट सारथी ई-कॉमर्स (मर्चंट मोड्यूल)चा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर ढोरे यांनी केले. तसेच नागरिकांनी आपल्या भागातील व्यवसायिकांनी या योजनेत सहभागी व्हावे म्हणून पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये होणारे विविध कार्यक्रम, तसेच सुरू असणाऱ्या विविध सवलत योजना यांची माहिती पीसीएमसी स्मार्ट सारथी ॲपमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पीसीएमसी स्मार्ट सारथीच्या मर्चंट मोड्युलमध्ये नोंदणी केल्यामुळे व्यापारी बांधवांना विविध लाभ मिळतील.

महापालिकेच्या अधिकृत ॲप्लीकेशन आणि वेब पोर्टलवर जाहिरात करण्याची सुवर्णसंधी मिळाल्यामुळे व्यावसायाची मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी होईल. व्यापाऱ्यांना पिंपरी-चिंचवडमधील जास्तीत-जास्त नागरिकांपर्यंत पोहोचता येईल.

ॲपमुळे व्यापाऱ्यांनी जाहीर केलेल्या योजना ग्राहकांपर्यंत तात्काळ पोहोचतील. ग्राहकांच्या नेमक्या गरजा काय आहेत, याची माहिती व्यापारी बांधवांना मिळेल. ही सुविधा पीसीएमसी स्मार्ट सिटी मार्फत राबविली जात असल्यामुळे यात नागरिक आणि व्यवसायिक यांच्या डेटा सुरक्षिततेची योग्य ती काळजी घेण्यात आली आहे, असे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डीकर सांगितले.

सुरुवातीला ही सुविधा नि:शुल्क उपलब्ध असून जास्तीत-जास्त व्यापाऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. प्रारंभिक टप्प्यामध्ये सदर सुविधा QR कोड स्कॅन तत्त्वावर सुरु करण्यात येत आहेत. आजपर्यंत सव्वा लाख नागरिकांनी पीसीएमसी स्मार्ट सारथी ॲप डाउनलोड करण्यात आले आहे.

मर्चंट मोड्यूलमध्ये 102 व्यापाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ‘पीसीएमसी स्मार्ट सारथी’ हे मोबाईल ॲप डाउनलोड करण्याचे तसेच ई-कॉमर्स प्रणाली (मर्चंट मोड्युल) या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन स्मार्ट सिटी कंपनीने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.