Pimpri News: YCMH मधील ई-हेल्थकार्ड प्रणाली आता इतर रूग्णालयांमध्येही

वायसीएम रूग्णालयात बाह्यरूग्ण विभागामध्ये उपचारासाठी येणारे रूग्ण वैद्यकीय अधिका-यांकडे गेल्यानंतर त्यांच्या आजाराविषयीची सर्व माहिती हेल्थकार्ड प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात येते.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयामध्ये राबविण्यात येत असलेली ई-हेल्थकार्ड प्रणाली आता टप्प्याटप्प्याने महापालिकेच्या इतर रूग्णालयांमध्ये राबविण्याचा महापालिकेचा प्रयत्न सुरू आहे. या प्रणालीमुळे महापालिकेच्या इतर रूग्णालयांमध्येही रूग्णांच्या आजाराचे अचूक निदान व तात्काळ वैद्यकीय उपचार करणे सोपे होणार आहे.

महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये दररोज हजारो रुग्ण विविध उपचारांसाठी येत असतात. या रूग्णांची सर्व माहिती डिजीटल स्वरूपात जतन व्हावी या दृष्टीने महापालिकेने सन 2011 साली अमृता टेक्नॉलॉजीज या कंपनीच्या सहकार्याने ई-हेल्थकार्ड प्रणालीची अंमलबजावणी सुरू केली आहे. वायसीएम रुग्णालयामध्ये ज्या रुग्णाकडे हेल्थकार्ड आहे, अशा रूग्णांवर उपचार करण्यात येतात. ही सेवा संपूर्णत: ऑनलाईन करण्यात आली आहे.

वायसीएम रूग्णालयात बाह्यरूग्ण विभागामध्ये उपचारासाठी येणारे रूग्ण वैद्यकीय अधिका-यांकडे गेल्यानंतर त्यांच्या आजाराविषयीची सर्व माहिती हेल्थकार्ड प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात येते. डॉक्टरांनी दिलेली औषधांबाबतची माहितीही या प्रणालीत समाविष्ट होते.

या सुविधेमुळे रूग्णास कोणतीही कागदपत्रे जवळ जतन करावी लागत नाहीत. वैद्यकीय अधिका-यांना रूग्णांची माहिती एका क्लिकद्वारे उपलब्ध होते. या प्रणालीमुळे रूग्णांची तपासणी आणि उपचार यामध्ये मोठ्या प्रमाणात वेळेची बचत झाली आहे.

वैद्यकीय अधिका-यांनी सुचविलेल्या विविध तपासण्या, चाचण्या तसेच रक्ताचा अहवाल, एक्स-रे, सोनोग्राफी, सीटी स्कॅन, एमआरआय आदी बाबींची माहिती या प्रणालीत समाविष्ट आहे. लॅबोरेटरी आणि विविध रेडीओलॉजी उपकरणांसोबत ई-हेल्थकार्ड प्रणालीचे इंटीग्रेशन करण्यात आले आहे.

त्यामुळे रूग्ण तपासणीचे अचूक अहवाल प्रणालीद्वारे वैद्यकीय अधिका-यांना तात्काळ प्राप्त होतात. त्यामुळे अचूक निदान व तात्काळ वैद्यकीय उपचार करणे सोपे झाले आहे. ही हेल्थ कार्ड प्रणाली वायसीएम रूग्णालयाबरोबरच टप्प्याटप्प्याने महापालिकेच्या इतर रूग्णालयांमध्ये राबविण्याचाही महापालिकेचा विचार आहे. काही निवडक रूग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

अमृता टेक्नॉलॉजीजच्या समन्वयाने रूग्णालयातील अंतरूग्ण विभागाअंतर्गत उपचार घेणा-या रूग्णांची माहिती ई-हेल्थकार्ड प्रणालीत समाविष्ट करण्याची सुविधाही लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या प्रणालीद्वारे संबंधित रूग्णांना डॅशबोर्ड सुविधेद्वारे त्यांची आरोग्य विषयक माहिती घरबसल्या कधीही पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे. तसेच संबंधित रूग्णांना रूग्णालयात उपचारासाठी अथवा पुर्नतपासणीसाठी येण्याकरिता ई-मेलद्वारे अथवा एसएमएसद्वारे अवगत करण्याची सुविधाही लवकरच उपलब्ध होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.