Pimpri News: आतुरता श्री गणेश आगमनाची; बाजारपेठही सजली

मिरवणूक आणि एकत्र येण्यासंदर्भात बंधने घातली आहेत. त्यामुळे सार्वजनिकसह घरगुती गणेश उत्सव साधेपणाने साजरा करण्यावर भर दिला जाणार आहे.

एमपीसी न्यूज – गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश उत्सव साजरा करण्यावर काही प्रमाणात बंधने लादली आहेत. त्यामुळे यावर्षी घरगुती सजावट करण्यावर भर देत यावर्षी साधेपणाने गणेश उत्सव साजरा करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. बाजारात सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू उपलब्ध झाल्या असून बाजारपेठ नानाविध वस्तू आणि सजावट साहित्याने सजली आहे.

तसं पाहिलं तर गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी महिनाभर अगोदरपासून सुरु होते. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश उत्सव साजरा करण्यावर काही प्रमाणात मर्यादा आल्या आहेत. गणेश उत्सवासाठी सरकारने नियमावली जाहीर केली असून त्यानुसार घरगुती दोन तर सार्वजनिक चार फूट उंचीच्या गणेश मूर्तीसाठी परवानगी देण्यात आली आहे.

तसेच मिरवणूक आणि एकत्र येण्यासंदर्भात बंधने घातली आहेत. त्यामुळे सार्वजनिकसह घरगुती गणेश उत्सव साधेपणाने साजरा करण्यावर भर दिला जाणार आहे.

गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपले असल्यामुळे बाजारपेठत सजावट संबंधी विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. सजावटीसाठी लागणाऱ्या विविध रंगाची फुले, पताका, शेला, रंगीबेरंगी माळा, फेटा, बाप्पासाठी लागणारे मंदिर तसेच विविध लायटिंगच्या माळा, रंगीबेरंगी बल्ब यासारख्या नानाविध वस्तू बाजारपेठेत उपलब्ध झाल्या आहेत. सजावट साहित्य खरेदीसाठी गणेशभक्त बाजारपेठेत गर्दी करताना दिसत आहेत.

गणपती बाप्पांच्या नवैद्यासाठी विविध प्रकारची मिठाई देखील मिठाई मार्केट मध्ये पाहायला मिळत आहेत. लाडू, पेढे, मोदक या सारख्या मिठाई खरेदीसाठी ग्राहक पसंदी देत आहेत.

श्री गणेशाच्या विविध रंगाच्या आणि आकाराच्या आकर्षक मूर्ती बाजारात आल्या असून गणेश चतुर्थी दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी अनेकजण अगोदरच गणेश मूर्ती घरी घेऊन जात आहेत.

दरवर्षी गणेश उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. मात्र गेल्या सहा महिन्यापासून देशात व जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस देशात व राज्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत लक्षणीय वाढ पाहायला मिळत आहे. त्यामुळे, गणेश उत्सव साधेपणाने साजरा करण्यावर भर देण्याचे आवाहन सरकारने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.