Pimpri news: ‘स्थायी’ची निवडणूक गुप्त मतदानाद्वारे घ्या – नाना काटे

एमपीसी न्यूज – स्थायी समिती सभापती पदाची उद्या शुक्रवारी होणारी निवडणूक प्रक्रिया ही आवाजी मतदान ऐवजी गुप्त मतदानाद्वारे घ्यावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

काटे यांनी निवेदनात म्हटले आहे की, सत्ताधारी भाजपच्या गलिच्छ राजकारणाला त्यांचेच नगरसेवक पुरते वैतागले आहेत. उद्या होणाऱ्या स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपचे काही सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मदत करणार आहेत, परंतु आवाजी मतदान प्रक्रियेमुळे ते धास्तावत आहेत. त्यामुळे गुप्त मतदान घेतले तर खात्रीशीर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला बहुमत मिळणार आहे. आणि हीच भीती भाजपच्या स्थानिक नेत्यांना आहे.

त्यामुळे स्थायी समितीच्या विद्यमान सदस्यांना शपथ देऊन बांधून घेण्याचा कुटील डाव सत्ताधारी भाजप नेते करत असल्याची चर्चा आहे. आपल्या सदस्यांवर असा अविश्वास दाखवून भाजप नेते सदस्यांचा अपमान करत आहेत. याची प्रचंड चीड सदस्य खाजगीत व्यक्त करत आहेत.

…तर पिंपरी चिंचवडच्या राजकारणात मोठी उलथापालथ

रवी लांडगे यांची नाराजी, भाजपमधील अंतर्गत गटबाजी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला सांगली पॅटर्नचा दावा, यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे जर गुप्त मतदान झाले तर पिंपरी चिंचवडच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.