Pimpri News: उपमहापौरपदासाठी 6 नोव्हेंबरला निवडणूक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या रिक्त झालेल्या उपमहापौरपदासाठी 6 नोव्हेंबर 2020 रोजी निवडणूक होणार आहे. 2 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज दाखल करायचे आहेत. याबाबतची माहिती महापालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार उपमहापौर तुषार हिंगे यांनी बुधवारी (दि.14) तडकाफडकी पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे उपमहापौरपद रिक्त झाले आहे. या पदासाठी 6 नोव्हेंबर 2020 रोजी निवडणूक होणार आहे.

महापालिकेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी अकरा वाजता विशेष सभेत ही निवडणूक प्रक्रिया होणार आहे. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत.

महापालिकेत भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे भाजपचा उपमहापौर होणार हे निश्चित आहे. आगामी पालिका निवडणुकीला 14 महिन्यांचा कालावधी आहे. त्यापार्श्वभूमीवर भाजप उपमहापौरपदी कोणाला संधी देतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघातील सदस्याला की चिंचवड विधानसभा मतदारसंघात उपमहापौरपद जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

..असे आहे पक्षीय बलाबल !

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची निविर्विदा सत्ता आहे. त्यामुळे भाजपचा उपमहापौर होणार हे निश्चित आहे. भाजपचे तब्बल 76 नगरसेवक आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे 34, शिवसेना 9, मनसे 1 आणि अपक्ष 5 असे 125 नगरसेवक आहेत. अपक्ष नगरसेवक भाजपशी सलंग्न आहेत.

भाजपचे 77 नगरसेवक होते. पण, दिघीचे लक्ष्मण उंडे यांचे कोरोनाने निधन झाले आहे. त्यामुळे 76 नगरसेवक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे 36 नगरसेवक होते. चिखलीचे दत्ता साने, आकुर्डीचे जावेद शेख यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे संख्याबळ घटून 34 झाले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.