Pimpri news: महापालिका प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी 9 ऑक्टोबरला निवडणूक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठ प्रभाग समित्या अध्यक्षपदाची निवडणूक 9 ऑक्टोबर 2020 रोजी होणार आहे. पालिकेतील मधुकर पवळे सभागृहात सकाळी साडे अकरा वाजता निवडणुकीला सुरुवात होणार आहे. अपंग कल्याण विभागाच्या आयुक्त प्रेरणा देशभ्रतार निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत, अशी माहिती पालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली. दरम्यान, आठही प्रभागात भाजपचे वर्चस्व असल्याने आठही अध्यक्ष भाजपचे होणार हे निश्चित आहे.

कोरोनामुळे पुढील आदेशापर्यंत विषय समित्या, प्रभाग अध्यक्षाच्या नवीन नेमणूका करू नयेत असा आदेश राज्य सरकारने दिला होता. परंतु, अनलॉकमध्ये तो निर्णय मागे घेत ऑनलाईन सभेत निवडणूक घेण्यास नुकतीच परवानगी दिली आहे.

महापालिकेच्या आठ प्रभाग समित्या आहेत. विद्यमान अध्यक्षांचा वर्षाचा कार्यकाळ एप्रिल महिन्यातच संपला होता. प्रभाग समित्या बरखास्त होत नसल्याने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर त्यांना पुढील आदेशापर्यंत मुदतवाढ मिळाली होती. आता 9 ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे. व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे ही सभा होणार आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणे अपेक्षित आहे. निवडणुकीला 15 महिन्यांचा कालावधी राहिला आहे. मागील साडेतीन वर्षात कोणतेही पद मिळाले नसलेल्या भाजप नगरसेवकांनी किमान प्रभाग अध्यक्षपद मिळावे यासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

आठही प्रभाग समितीत भाजपचे वर्चस्व आहे. अध्यक्ष भाजपचे होणार हे निश्चित आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.