Pimpri News: कोरोनामुळे निवडणुका लांबणीवर; महापालिका प्रभाग अध्यक्षांना मिळाली मुदतवाढ

एमपीसी न्यूज – राज्यात कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने वाढत असल्याने राज्य सरकारने महापालिकांच्या विषय समिती, प्रभाग अध्यक्षांच्या निवडणुका एका महिन्यासाठी पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे मार्चअखेर मुदत संपलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठ प्रभाग अध्यक्षांना मुदतवाढ मिळाली असून आठ प्रभाग अध्यक्ष भाग्यवान ठरले आहेत.

महापालिकेच्या आठ प्रभाग समित्या आहेत. विद्यमान अध्यक्षांचा कार्यकाल मार्च अखेर संपला आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये प्रभाग अध्यक्षांची निवडणूक होणार होती. तसे नियोजन महापालिकेच्या नगरसचिव विभागाने केले होते. पुणे महापालिकेच्या प्रभाग अध्यक्षांची निवडणूक चार दिवसांपूर्वीच पार पडली. परंतु, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. राज्यात कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने होत आहे.

वाढती रुग्णसंख्या, आरोग्य सुविधांवर असणारा ताण, संक्रमणात होत असणारी वाढ यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे अधिनियमातील तरतुदींच्या अनुषंगाने राज्यातील महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या स्थायी समिती, सर्व विषय समिती सभापती, प्रभाग अध्यक्षांच्या निवडणुका पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलल्या आहेत.

_MPC_DIR_MPU_II

कोरोना परिस्थितीचा आढावा, एक महिन्यानंतर वस्तुस्थिती व तपशीलच्या आधार घेऊन निवडणुकाबाबत पुढील निर्णय कळविण्यात येईल, असे राज्याच्या नगरविकास खात्याचे अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांनी महापालिकेला कळविले आहे.

राज्य सरकारच्या निर्णयाचा सत्ताधारी भाजपच्या प्रभाग अध्यक्षांना फायदा !

या निर्णयाचा महापालिकेच्या प्रभाग अध्यक्षांना फायदा झाला आहे. त्यामुळे त्यांना तूर्तास एक महिन्याची मुदतवाढ मिळाली आहे.  ‘अ’ प्रभाग अध्यक्ष शर्मिला बाबर, ‘ब’ प्रभाग सुरेश भोईर, ‘क’ प्रभाग राजेंद्र लांडगे, ‘ड’ प्रभाग सागर आंगोळकर, ‘ई’ प्रभाग विकास डोळस, ‘ग’ प्रभाग  बाबा त्रिभुवन, ‘ह’ प्रभाग हर्षल ढोरे आणि ‘फ’ प्रभागाचे अध्यक्ष कुंदन गायकवाड हे भाग्यवान ठरले असून त्यांना मुदतवाढ मिळाली आहे. त्यांची 9 ऑक्टोबर 2020 रोजी प्रभाग अध्यक्षपदी निवड झाली होती.

महापालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप म्हणाले, “प्रभाग अध्यक्षांची मुदत मार्च अखेर संपली आहे. एप्रिल महिन्यात नवीन अध्यक्षांची निवडणूक घेतली जाणार होती. परंतु, राज्य सरकारने निवडणुका महिन्याभरासाठी पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे प्रभाग अध्यक्षांना मुदतवाढ मिळाली आहे. नवीन अध्यक्ष निवड होईपर्यंत विद्यमान अध्यक्षांना पदावर काम करता येईल.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.