Pimpri News: निवडणूक वर्षामुळे करवाढ टळली; महासभेने केले शिक्कामोर्तब

एमपीसी न्यूज – महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचे वर्ष असल्याने यंदा करवाढ टळली आहे. आगामी आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये कोणतीही करवाढ न करता मिळकत कराचे दर ‘जैसे थे’ ठेवले आहेत. याबाबतच्या प्रशासनाच्या प्रस्तावावर स्थायी समिती पाठोपाठ महासभेने आज (गुरूवारी) शिक्कामोर्तब केले.

त्यामुळे आर्थिक वर्षात करवाढ, पाणीपट्टीची दरवाढ होणार नाही. निवडणूक वर्ष असल्याने पिंपरी-चिंचवडकरांना करवाढीपासून दिलासा मिळाला आहे.

महापालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणे अपेक्षित आहे. निवडणुकीसाठी 10 ते 11 महिन्यांचा कालावधी राहिला आहे. निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरिता 20 फेब्रुवारी 2021 पूर्वी करांचे दर ठरविणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र महापालिका अधिनियम मधील कलम 19 अन्वये सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी करांचे दर ‘जैसे थे’ ठेवले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सध्या 5 लाख 39 हजार 175 मालमत्तांची नोंदणी आहे. त्यात व्यावसायिक मालमत्तांची संख्या 47 हजार 614 आहे. निवासी मालमत्तांमध्ये सुमारे 6 लाख 35 हजार कुटुंब वास्तव्यास आहेत. त्यामध्ये वार्षिक सरासरी सहा टक्के वाढ होत असल्याचा जनगणनेचा निष्कर्ष आहे. त्याचा आधार घेता शहरात सध्या सुमारे 6 लाख 10 हजार मालमत्ता अस्तित्वात असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे.

कर योग्य मूल्याच्या टप्प्यानुसार निवासी मालमत्तांसाठी 1 ते 12 हजार रुपयांपर्यंत 13 टक्के, बारा हजार एक रुपया ते 30 हजारांपर्यंत 16 टक्के आणि तीस हजार आणि त्यापुढील मूल्यासाठी 24 टक्के असे सध्याचे दर आहेत.

हेच दर आगामी आर्थिक वर्षात कायम ठेवण्यात आले आहेत. तसेच, साफसफाई कर, अग्निशामक कर, वृक्षकर आणि शिक्षण कर जैसे थे ठेवण्यात आले आहेत. निवासेतर करशुल्कही ‘जैसै थे’ ठेवण्यात आले आहेत.

याखेरिज मालमत्ता उतारा, हस्तांतरण नोटीस, प्रशासकीय सेवा, थकबाकी नसल्याचा दाखला देणे यासाठी आकारण्यात येणारे शुल्क आहे. तसेच राहणार आहे.

आयुक्तांच्या 2021-2022 या आगामी आर्थिक वर्षामध्ये सामान्य कर ‘जैसे थे’ ठेवण्याचा प्रस्तावला स्थायी समिती पाठोपाठ महासभेने मान्यता दिली आहे. एप्रिल महिन्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.