Pimpri News: महापालिका कर्मचारी महासंघाच्या आंदोलनाकडे कर्मचाऱ्यांची पाठ!

केवळ 300 कर्मचाऱ्यांचा आंदोलनात सहभाग

एमपीसी न्यूज – ‘धन्वंतरी स्वास्थ’ योजना बंद करु नये यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाने केलेल्या आंदोलनाकडे कर्मचा-यांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. आंदोलनात केवळ 300 कर्मचा-यांनी सहभाग घेतला होता.

‘धन्वंतरी स्वास्थ’ योजना बंद करण्याच्या प्रशासनाच्या हालचाली सुरु असल्याने महासंघाने आक्रमक भूमिका घेत काम बंद आंदोलन करावे, अशी काही कर्मचा-यांची मागणी होती. पण, महासंघ बोटचेपी भूमिका घेत असल्याने कर्मचा-यांनी पाठ फिरविल्याची चर्चा आहे.

महापालिका सेवेतील, सेवानिवृत्त कर्मचा-यांसाठी ‘धन्वंतरी स्वास्थ’ ही वैद्यकीय योजना 1 सप्टेंबर 2015 पासून लागू करण्यात आली होती. 7500 कर्मचारी वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीसाठी 300 रुपये वर्गणी देत होते. तर, निवृत्त 150 कर्मचारी 150 रुपये वर्गणी भरत असून महापालिका 600 रुपये हिस्सा भरत होते.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिका कर्मचा-यांठी लागू असलेली ‘धन्वंतरी स्वास्थ’ योजना बंद करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. तसेच कर्मचा-यांठी खासगी विमा पॉलिसी लागू करण्याची कार्यवाही चालू आहे. आयुक्त हर्डीकर रजेवर असतानाही खासगी विमा पॉलिसी लागू करण्याचा आदेश अधिका-यांना देत आहेत.

धन्वंतरी योजना बंद करु नये, यासाठी कर्मचारी महासंघाने आज (बुधवारी) महापालिका प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. पण, आंदोलनाकडे अनेक कर्मचा-यांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. केवळ 300 कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते.

महासंघ कर्मचा-यांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरत आहे. महासंघाला स्वतःच्या ताकदीने कर्मचाऱ्यांचे कोणतेही प्रश्न सोडवता येत नाही, म्हणून कर्मचारी महासंघाचा राजकीय आखाडा बनवण्याचा डाव रचलेला आहे.

कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी आज कर्मचारी महासंघाने केलेले आंदोलन आणि त्यात फक्त 300 कर्मचारी उपस्थित होते. ही एक अत्यंत दुर्दैवी   बाब आहे, अशा प्रतिक्रिया कर्मचा-यांनी दिल्या आहेत.

याबाबत कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे म्हणाले, ”गेट मिटींग घेतली होती. त्याला 700 ते 800 कर्मचारी हजर होते. वारकरी सांप्रदायाचा कार्यक्रम चालू होता. त्यामुळे आम्ही तिथे गेले होतो”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.