Pimpri News: प्रधानमंत्री आवास योजनेचे अर्ज स्वीकारण्यास मुदतवाढ द्या; महापौरांची आयुक्तांना सूचना

पिंपरी-चिंचवड पालिकेमार्फत च-होली, रावेत आणि बो-हाडेवाडी येथील आरक्षित जागांवर सर्वांसाठी घरे संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येत आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत च-होली, रावेत आणि बो-हाडेवाडी येथील आरक्षित जागांवर सर्वांसाठी घरे संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठीचे अर्ज स्वीकारण्यास 15 दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी सूचना महापौर उषा ढोरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली आहे.

केंद्रीय गृहनिर्माण व शहरी गरीबी निर्मुलन मंत्रालयाकडील प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्गदर्शन सुचनांनुसार पिंपरी-चिंचवड पालिकेमार्फत च-होली, रावेत आणि बो-हाडेवाडी येथील आरक्षित जागांवर सर्वांसाठी घरे संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येत आहे.

तथापि या योजनेकरिता अर्ज भरण्याची मुदत 17 सप्टेंबर रोजी संपुष्टात येत आहे. पिंपरी-चिंचवड ही औद्योगिक व कामगारनगरी असून अनेक गोरगरीब कामगार हे पिंपरी- चिंचवड शहरात वास्तव्यास आहेत.

_MPC_DIR_MPU_II

कोरोना विषाणूचे संकट व लॉकडाऊनमुळे बरेच उद्योग, व्यवसाय हे पूर्वपदावर न आल्याने ब-याच गोरगरीब कष्टकरी, कामगार व खाजगी नोकरदार वर्गास जीवन जगण्याची भ्रांत पडलेली आहे. तसेच सध्या रोजगार उपलब्ध नसल्याने त्यांची आर्थिक स्थिती खालावलेली आहे.

योजनेकरिता अर्ज भरण्यास नागरिकांना आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, बँक खाते व इतर संबंधित कागदपत्रे तसेच पाच हजार रुपयांचा डीडी देणे आवश्यक आहे.

परंतु, शहरातील बहुतांशी नागरिकांची सदर अर्जाची प्रक्रिया अद्याप पुर्ण झाली नसल्याने व अर्ज मुदतीत सादर करणेकामी अडचण निर्माण होत असल्याची बाब निदर्शनास येत आहे. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेचे अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकानंतर पुढील पंधरा दिवस मुदतवाढ देण्यात यावी, असे महापौरांनी पत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.