Pimpri News: ‘प्रोजेक्ट मॉनिटरींग’च्या संस्थेला पुन्हा मुदतवाढ

वर्षभरात चौथ्यांदा मुदतवाढ; आता दोन महिने

एमपीसी न्यूज – जेएनएनयुआरएम, अमृत अभियान, स्वच्छ भारत अभियान तसेच केंद्र सरकार पुरस्कृत विविध योजनांच्या प्रोजेक्ट मॉनिटरींग अ‍ॅण्ड रिफॉर्म इम्प्लीमेंटेशन सपोर्टचे कामकाज करणा-या संस्थेला पुन्हा दोन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. या संस्थेला वर्षभरात तब्बल तीन वेळा तीन महिने कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता चौथ्यांदा दोन महिन्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

महापालिकेत जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनर्निर्माण अभियान (जेएनएनयुआरएम), अमृत अभियान, स्वच्छ भारत अभियान तसेच केंद्र सरकार पुरस्कृत विविध योजनांच्या अनुषंगाने प्रोजेक्ट मॉनिटरींग अ‍ॅण्ड रिफॉर्म इम्प्लीमेंटेशन सपोर्टचे कामकाज करण्यासाठी 2019 मध्ये केपीएमजी अ‍ॅडवायझरी सर्व्हीसेस यांची एक वर्षे कालावधीसाठी नेमणूक करण्यात आली होती.

या संस्थेची मुदत 22 जानेवारी 2020 रोजी पूर्ण झालेली असून त्यांना तीन वेळा तीन महिने कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आली.

जेएनएनयुआरएम अंतर्गत दुस-या टप्प्यामध्ये मंजुरी मिळालेल्या प्रकल्पांची मुदत वाढविण्यात आली आहे. तसेच त्यानंतर या प्रकल्पांकरिता आवश्यक उर्वरीत निधी राज्य सरकार आणि महापालिका फंडातून उपलब्ध करून चालू प्रकल्पांचे कामकाज पूर्ण करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने घोषीत केलेल्या अमृत अभियानासाठी राज्य सरकारने सन 2015-16 मध्ये तयार केलेल्या राज्य वार्षिक कृती आराखड्यामध्ये पुढील तीन वर्षाकरिता एकूण 270 कोटी रूपयांच्या प्रकल्पांचा समावेश केला आहे.

महापालिकेने पाणीपुरवठा आणि मलनि:सारण विषयक प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. त्या अनुषंगाने या प्रकल्पासाठी महापालिकेस मंजुर रकमेचा हप्ता सरकारकडून प्राप्त होण्याकरिता पाठपुरावा करून मुदतीत कार्यवाही करणे गरजेचे आहे.

जेएनएनयुआरएम अंतर्गत निवड केलेल्या शहरातील विविध प्रकल्पांचे मासिक-त्रैमासिक अहवाल सरकारकडे सादर करणे. तसेच टप्पा दोनमधील अमृत योजना आणि स्वच्छ भारत अभियानामध्ये मंजुर झालेल्या प्रकल्पांचे कामकाज कार्यान्वित असून त्याचे अहवालही सरकारकडे वेळोवेळी सादर करण्यात येणार आहे.

हे सर्व कामकाज केपीएमजी अ‍ॅडवायझरी सर्व्हीसेस यांच्यामार्फत करण्यात येत आहे. या संस्थेला तीन वेळा तीन महिने कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आली. तथापि, कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे निविदा प्रक्रीयेद्वारे नव्याने संस्था नेमणूक करायचे कामकाज पूर्ण झालेले नाही.

केपीएमजी संस्थेचे कामकाज अद्याप सुरू आहे. नवीन निविदा प्रक्रीयेला आणखी कालावधी लागणार आहे. त्यामुळे सद्यस्थितीत केपीएमजी संस्थेला आणखी दोन महिने कालावधोकरिता मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

त्यानुसार 23 ऑक्टोबरपासून पुढील दोन महिने कालावधीकरिता ही मुदतवाढ आहे. त्यानुसार, दोन ऑन साईट स्टाफसाठी दरमहा पाच लाख रूपये इतका खर्च होणार आहे. हा विषय आगामी स्थायी समिती सभेसमोर ठेवण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.