Pimpri News : न्यायालयाच्या आदेशाविरोधात न्यायालयासमोर लाक्षणिक उपोषण

एमपीसी न्यूज – एका पोटगीच्या दाव्यामध्ये प्रतिवादीची बाजू जाणून न घेता, निकाल देण्यापूर्वी अ‍ॅफिडेव्हिट न करता न्यायालयाने निकाल दिला असल्याचा आरोप ज्योतिषाचार्य अतुल छाजेड यांनी केला आहे. याबाबत छाजेड पुणे कौटुंबिक न्यायालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती अतुल छाजेड यांनी दिली.

अतुल छाजेड म्हणाले, “संदीप सूर्यवंशी (रा. विनायक नगर, नवी सांगवी) यांच्या विरोधात त्यांच्या पत्नीने सन 2016 मध्ये पोटगीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणात संदीप सूर्यवंशी यांची बाजू जाणून न घेता, क्रॉसिंग न करता न्यायालयाने निकाल दिला आहे. निकाल देण्यापूर्वी वादी आणि प्रतिवादी यांचे अ‍ॅफिडेव्हिट घेणे आवश्यक असताना संदीप सूर्यवंशी यांचे ऑफिडेव्हिट घेतले गेले नाही. थेट न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी केल्याचा आरोप छाजेड यांनी केला आहे.

न्यायालयाने दोन आदेश दिले आहेत. त्यातील पहिल्या आदेशात सात हजारांची पोटगी देण्याचा तर दुसऱ्या आदेशात दहा हजारांची पोटगी देण्यास न्यायालयाने सांगितले आहे. संदीप सूर्यवंशी यांची कमाई जास्त असून त्यानुसार सर्व पुरावे घेऊन जास्त पोटगीचा आदेश द्यावा. हे प्रकरण नव्याने सुनावणीसाठी घ्यावे, अशी विनंती सूर्यवंशी यांच्या वतीने छाजेड यांनी न्यायालयास केली आहे. असे न केल्यास शनिवारी (दि.9) पुणे कौटुंबिक न्यायालयासमोर छाजेड लाक्षणिक उपोषण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.