Pimpri News: सचिन वाझे यांच्या पत्रात नाव असलेल्या मंत्र्यांकडून पुरावे नष्ट होण्याची भीती : राजेश पिल्ले

तत्काळ तपास करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – मुंबई पोलीस दलातील निलंबित आणि अटकेत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात एनआयए स्पेशल कोर्टासमोर काही गंभीर बाबी सादर केल्या आहेत. राज्य सरकारमधील दोन बडे मंत्री आणि त्यांच्या जवळील एका व्यक्तीने पदाचा दुरुपयोग करून खंडणी मागितली. शासकीय अधिकाऱ्यावर दबाव आणून अवैध कृत्य करण्यास सांगितल्याचे पत्रात म्हटल्याचा दावा करत संबंधित व्यक्ती राजकीय दृष्ट्या बलाढ्य असल्याने पुरावे नष्ट होण्याची भीती आहे. त्यामुळे याबाबतचा तपास लवकरात लवकर करण्याची मागणी, भाजप दक्षिण भारतीय आघाडीचे संयोजक राजेश पिल्ले यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत केली.

याबाबत पिंपरी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला पिल्ले यांनी पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अंटेलिया, मुंबई येथील घराबाहेर एका गाडीत स्फोटके ठेवल्याप्रकरणी सचिन वाझे यांना ‘एनआयए’ने अटक केली आहे. वाझे यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात एनआयए स्पेशल कोर्टासमोर काही गंभीर बाबी सादर केल्या आहेत.

महाराष्ट्राच्या एक बलाढ्य मंत्र्यांतर्फे एका व्यक्तीने अवैधरित्या गुटखा व्यापार करणा-यांवर दबाव आणून 100 कोटी वसूल करावेत, असे वाझे यांना सांगितले. मंत्र्यांच्या हस्तकाने वाझे यांच्यावर अवैधरित्या गुटखा उत्पादन करणाऱ्या उत्पादकांवर, गुटखा विकणाऱ्या व्यापा-यांवर पदाचा गैरवापर करून दबाव आणला. नोकरी जाण्याची भीती दाखवून अवैधरित्या पैसे गोळा करण्यास सांगितले, असे वाझे यांनी पत्रात म्हटल्याचा दावा, पिल्ले यांनी केला.

त्याचबरोबर दुसऱ्या एका मंत्र्याने मुंबई महापालिकेतील कंत्राटदाराकडून एका निनावी तक्रारींच्या आधारावर प्रत्येकी 2 कोटी रुपये असे किमान 50 कंत्राटदाराकडून पैसे वसूल करावेत, असे वाझे यांना सांगितल्याचा दावाही पिल्ले यांनी केला. या मंत्र्यांनी पदाचा दुरुपयोगकरून खंडणी मागितली. शासकीय अधिकाऱ्यावर दबाव आणून अवैध्य कृत्य करण्यास सांगितल्याचे पत्रात म्हटल्याचा दावा करत पिल्ले यांनी याबाबतचा तपास करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.