Pimpri News : पिंपरी-चिंचवड शहर पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आज पासून सुरुवात

एमपीसी न्यूज  – पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात 216 पोलीस शिपाई पदांची भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणीला आज (सोमवार) पासून सुरुवात (Pimpri News) झाली आहे. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दोन, वानवडी, हडपसर पुणे येथे ही मैदानी प्रक्रिया 30 जानेवारी ते 6 फेब्रुवारी या कालावधीत पूर्ण होणार आहे.

शहर पोलीस भरतीचा दुसरा टप्पा सुरू आहे. यामध्ये 216 पोलीस शिपाई पदांची भरती केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात भरती झालेले उमेदवार नुकतेच कर्तव्यावर रुजू झाले आहेत. आता दुसऱ्या टप्प्यातील भरतीनंतर आयुक्तालयाला आणखी 216 एवढे मनुष्यबळ मिळेल. सन 2019 च्या पोलीस भरतीत झालेले गैरप्रकार यावेळी टाळण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे.

Pune Crime News : पाणीपुरी खाल्ली, पैसे मागताच चाकूने वार; शनिवारवाड्यासमोरील घटना

 

पोलीस भरती पारदर्शक पार पाडण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलीस भरती करून देतो, असे आमिष जर कोणी दाखवत असेल , तर त्यास उमेदवारांनी बळी पडू नये. असे प्रकार निदर्शनास आल्यास दक्षता अधिकारी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे (9529691966), पोलीस सह आयुक्त मनोज लोहिया (7977890897) यांच्याशी संपर्क करून माहिती देण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड पोलिसांनी केले आहे.

उमेदवारांना मिळालेल्या प्रवेश पत्रावरील तारखेस पहाटे पाच वाजण्या पूर्वी भरतीसाठी हजर रहावे. दिलेल्या तारखेस उमेदवार उपस्थित न राहिल्यास त्यांना तारीख बदलून दिली जाणार नाही. तसेच दुसरी संधी दिली जाणार नाही. भरतीसाठी येताना आवेदन अर्जाच्या, आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित, साक्षांकित प्रतीचे दोन सेट सोबत आणावे. आयकार्ड साईजचे दहा फोटो आणावेत, अशा सूचना पोलीस उपायुक्त (मुख्यालय) स्वप्ना गोरे यांच्याकडून करण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.