Pimpri News : पिंपरी -चिंचवडकरांना शास्तीकर माफी मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार; माजी आमदार विलास लांडे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांच्या मानगुटीवर बसलेला शास्तीकर कायमचा रद्द व्हावा आणि शास्तीकरात सरसकट माफी मिळावी यासाठी माजी आमदार विलास लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड शास्तीकर जनजागृती संस्थेने दंड थोपटले आहेत.

शास्तीकर माफीबाबत सरकार दरबारी पाठपुरावा तसेच प्रसंगी जनआंदोलन उभारण्याची पुढील दिशा ठरविण्यासाठी या संस्थेच्या वतीने आज (रविवारी, दि. 14) आढावा बैठक घेण्यात आली. त्यामध्ये मार्गदर्शन करताना माजी आमदार विलास लांडे यांनी शास्तीकर माफी आणि कर रद्द होत नाही तोपर्यंत पिंपरी-चिंचवडकरांचा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

भोसरी, लाडेवाडी येथील राजमाता जिजाऊ महाविद्यालयात ही आढावा बैठक पार पडली. यावेळी माजी आमदार विलास लांडे, पिंपरी चिंचवड शास्तीकर जनजागृती संस्थेचे उपाध्यक्ष व शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर, कार्याध्यक्ष यश साने, सचिव व माजी नगरसेवक विनायक रणसुभे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, उदय पाटील, तात्या सपकाळ, विलास नढे, राजेंद्र छेडे, उत्तम आल्हाट, आतिश बारणे, सुधाकर भोसले, अमर फुगे यांच्यासह शास्तीकराने त्रस्त झालेले शहरातील अनेक नागरिक उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

माजी आमदार विलास लांडे म्हणाले, “शास्तीकर हा गेल्या एक दशकापासून पिंपरी-चिंचवडकरांच्या मानगुटीवर बसलेला झिजिया कर आहे. तो रद्द व्हावा आणि शास्ती माफीची शहरातील नागरिक कित्येक वर्षांपासून मागणी करत आहेत. परंतु, नागरिकांच्या मागणीला दाद दिली जात नाही. शास्तीकराच्या थकित बिलावर नागरिकांना दंड आकारला जात आहे. त्यामुळे शास्तीकराचा थकित आकडा फुगला आहे. हा आकडा पाहून शास्तीकर वसुलीच्या नोटिसा आलेल्या नागरिकांच्या पोटात गोळा आलेला आहे. पोट भरण्यासाठीच संघर्ष करण्याची वेळ आलेल्या नागरिकांनी लाखोंच्या घरात आलेले शास्तीकर भरायचे कुठून हा प्रश्न आहे. त्यामुळे या नागरिकांच्या मनात शास्तीकराबाबत प्रचंड चीड निर्माण झालेली आहे. या नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा मिळावा, शास्तीकराचे भूत कायमचे नष्ट व्हावे यासाठी पिंपरी चिंचवड शास्तीकर जनजागृती संस्थेने एका संघटनेच्या नेतृत्वाखाली लढा उभारण्याबाबत घेतलेल्या निर्णयाला सर्व पिंपरी-चिंचडकरांनी साथ द्यावी. शास्तीकर कायमस्वरुपी रद्द होत नाही आणि कर माफ केले जात नाही तोपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

या आढावा बैठकीत राजेंद्र छेडा, रेखा दुधभाते, दशरथ जमदाडे, अमोल पानसरे, डॉ. अजित कदम या नागरिकांनी शास्तीकरामुळे किती मनःस्ताप सहन करावे लागत आहे, याबाबत आपले म्हणणे मांडले. अॅड. स्वप्निल पवार यांनी शास्तीकराविरोधात कायदेशीर लढा कसा द्यायचा याबाबत मार्गदर्शन केले. या बैठकीत शास्तीकर रद्द आणि माफीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून लवकरच निवेदन द्यायचे ठरले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक रणसुभे यांनी केले. धनंजय भालेकर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.