Pimpri News: वाळत घातलेल्या गव्हावर आलेले मांजर हाकलल्याने दोन गटात हाणामारी; परस्पर विरोधात गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – घरासमोर वाळत घातलेल्या गव्हावर आलेले मांजर हकलल्याच्या कारणाहून दोन गटांत हाणामारी झाली. ही घटना शुक्रवारी (दि. 15) पिंपरी गावातील माळी आळी येथे घडली. या प्रकरणी दोन्ही गटांनी पिंपरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

आकाश रामभुवन जैसवाल (वय 18, रा. पिंपरी गाव, माळी आळी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महादेव उर्फ साधू श्रीरंग गायकवाड (वय 19), ममता साधू उर्फ महादेव गायकवाड, बालाजी श्रीरंग गायकवाड, अनिता दिपक परतवार (सर्व रा. पिंपरी गाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आपल्या घरासमोर गहू वाळत घातले होते. या गव्हावर मांजर आल्याने फिर्यादी यांनी ते मांजर हकलले. याचा राग आल्याने आरोपी महादेव गायकवाड याने फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या बाबत फिर्यादी यांची आई विचारणा करण्यासाठी गेली असता इतर आरोपींनी त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी हे आईला सोडविण्यासाठी गेले असता आरोपी गायकवाड याने हातातील लोखंडी कोयत्याने फिर्यादी यांच्या हातावर आणि त्यांच्या आईच्या डोक्यावर मारून जखमी केले.

याच्या परस्पर विरोधात महिलेने फिर्याद दिली. त्यानुसार, आकाश जैसवाल (वय 18), संजय जैसवाल, कुसूम जैसवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे शेजारी राहतात. आरोपींनी आपल्या घरासमोर गहू वाळत घातलेले असताना फिर्यादी यांची  पाळीव मांजर त्या ठिकाणी गेली. याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी यांच्या घरात घुसून त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

फिर्यादी यांची आई आणि नणंद भांडण सोडविण्यासाठी गेल्या असता आरोपींनी त्यांना लाकडी बॅट आणि कपडे धुण्याच्या दांडक्याने मारहाण केली. दोन्ही गुन्ह्यांचा तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.