Pimpri News : ‘पालिकेला बोगस बिले देणाऱ्या स्पर्श रूग्णालयाच्या ‘सीईओ’वर गुन्हा दाखल करा’

राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनांची मागणी

एमपीसी न्यूज – भोसरीतील रामस्मृती मंगल कार्यालय आणि हिरा लॉन्स या ठिकाणच्या कोविड केअर सेंटरमध्ये एकही रुग्ण नसताना महापालिकेला पाच कोटीची बीले सादर करणा-या स्पर्श हॉस्पीटलचे सीईओ डॉ. अमोल हळकुंदे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी आमदार विलास लांडे, प्रहार संघटनेचे विजयराव ओव्हाळ यांनी केली आहे. हे विषय फेटाळून लावण्यात यावेत, तसेच ते मंजूर केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी दिला आहे.

एकही रुग्ण दाखल नसताना भोसरी येथील रामस्मृती मंगल कार्यालय आणि हिरा लॉन्स या दोन कोविड सेंटर चालविणाऱ्या स्पर्श हॉस्पिटलचे सीईओ डॉ. अमोल हळकुंदे यांनी पाच कोटी 26 लाख 60 हजार आठशे रुपयांचे बिल पालिकेकडे मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या सेंटरसाठी पालिकेने करारच केला नसतानाही तसेच तेथे एकाही रुग्णावर उपचार झाले नसतानाही त्यांनी सव्वापाच कोटी रुपयांचे हे बिल मागणे म्हणजे ही पालिकेची शुद्ध फसवणूक आहे. त्यात ते अदा करण्याच्या स्थायी समितीने सुरु केलेल्या हालचाली म्हणजे प्रामाणिक कर भरणाऱ्या जनतेच्या कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी ठरणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

महापालिका अधिकारी सामील असल्याशिवाय डॉ. हळकुंदे हे धाडस करणार नाहीत. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांचीही चौकशी करून त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी. सध्याच्या स्थायीची मुदत या महिनाअखेर संपत असल्याने त्यांनी असे चुकीचे विषय मंजुरीचा धडाका त्यांनी सध्या लावलेला आहे.त्यामुळे हा विषयही ते मंजूर करण्याची दाट शक्यता आहे, असे लांडे यांनी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री तसेच नगरविकासमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

या विषयामध्ये पदाधिका-यांचे हितसंबंध आहेत. याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. हा विषय मंजूर केला, तर कायदेशीर कारवाईचा इशारा मारुती भापकर यांनी दिला आहे.

तर जनतेच्या पैशांची उधळपट्टी थांबवावी. स्पर्श रुग्णालयाचे सीईओ डॉ. अमोल हळकुंदे यांच्यावर फौजदारी दाखल करावी. त्यांनी सादर केलेली बीले त्वरित थांबवावीत. या प्रकरणात गुंतलेल्या व दोषी अधिका-यांना निलंबित करुन त्यांची खातेनिहाय चौकशी करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रहार संघटनेचे विजयराव ओव्हाळ यांनी निवेदनाद्वारे आयुक्तांना दिला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.