Pimpri News: ‘ऑटो क्लस्टर’मध्ये बेडसाठी पैसे घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा : महापौरांचा आदेश

ऑटो क्लस्टर, जम्बो सेंटर महापालिकेच्या ताब्यात घेण्याचे आदेश

एमपीसी न्यूज – ऑटो क्लस्टर येथील चालवायला दिलेले कोरोना हॉस्पिटल कोणाच्या बापाच्या मालकीची प्रॉपर्टी नाही. स्पर्श संस्थेला महापालिका पैसे देते. मोफत उपचाराची सोय असलेल्या बेडसाठी एक लाख रुपये घेतल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा आदेश महापौर उषा ढोरे यांनी महापालिका प्रशासनाला दिला.

तसेच ऑटो क्लस्टर, जम्बो कोविड सेंटरचे संचलन महापालिकेने करावे. खासगी संस्थेच्या ताब्यातून काढून घ्यावे, असे आदेशही त्यांनी दिले.

चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये महापालिकेचे कोविड हॉस्पिटल सुरू असून स्पर्श ही खासगी संस्था त्याचे संचलन करते. मोफत उपचार होत असलेल्या या हॉस्पिटलमध्ये महापालिका शाळेच्या मुख्याध्यापिकेला आयसीयू बेड देण्यासाठी एक लाख रुपये घेतल्याचा प्रकार भाजप नगरसेवक विकास डोळस, कुंदन गायकवाड यांनी उघडकीस आणला. त्यावर महासभेत पाच तास चर्चा झाली.

नगरसेवकांनी ऑटो क्लस्टर, जम्बो कोविड सेंटरबाबत तक्रारींचा भडीमार केला. बेडसाठी पैसे घेणा-यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

नगरसेवकांच्या भावना समजून घेतल्यानंतर महापौर ढोरे यांनी प्रशासनाला कडक शब्दांत आदेश दिले.

महापौर ढोरे म्हणाले, ऑटो क्लस्टरमध्ये पैसे घेऊन बेड उपलब्ध करुन दिल्याचा प्रकार उघडकीस आणणा-या नगरसेवकांचे मी अभिनंदन करते. ऑटो क्लस्टर हॉस्पिटल कोणाच्या बापाच्या मालकीची प्रॉपर्टी नाही. बेडसाठी पैसे घेणा-यांवर कोणत्याही परिस्थितीत गुन्हा दाखल करावा. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. कोणाला माफ करणार नाही. रुग्णांकडून पैशांची मागणी करत ठेकेदार महापालिकेचे बदनामी करतो. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. पैसे मागणा-याला किती दिवसात शोधणार हे आयुक्तांनी सांगावे; अन्यथा आयुक्तांनी त्यांच्या दालनात जावू नये.

ऑटो क्लस्टर, जम्बो कोविड केअर सेंटर महापालिकेच्या ताब्यात घ्यावे. मनुष्यबळ उपलब्ध करुन महापालिकेने ते चालवावे. त्यासाठी डॉक्टरांची टीम तयार करावी. महापालिका पैसे देत असताना ऑटो क्लस्टर, जम्बोत पालिकेच्या अधिका-यांना ताटाखालचे मांजर करणे चुकीचे आहे. स्पर्शचे डॉ. अमोल होळकुंदे, डॉ. संग्राम कपाले, डॉ. प्रिती व्हिक्टर यांना हाकलून द्यावे, असा आदेश महापौरांनी दिला.

त्यावर खुलासा करताना आयुक्त राजेश पाटील म्हणाले, ”जी चुकीचे कामे माझ्या नजरेसमोर आली. त्यावर आजपर्यंत कारवाई केली. यापुढेही करणार आहे. स्पर्शमध्ये पैसे घेऊन बेड मिळवून देणा-यांवर निश्चितपणे गुन्हा दाखल केला जाईल. पोलीस आयुक्तांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची विनंती करुन सत्य समोर आणले जाईल”. याबरोबर स्मशानभूमीत पैसे घेत असल्याची तक्रार आल्यानंतर त्या व्यक्तीची बदली केली. जम्बो हॉस्पिटल, वायसीएममधील फॉर्मासिस्टवर आरोप झाल्यानंतर त्यांचीही बदली केल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.