Pimpri News: ‘मोफत बेड’साठी एक लाख रुपये घेणाऱ्या ‘स्पर्श’, ‘पद्मजा’वर खंडणी, दरोड्याचा गुन्हा दाखल करा; महासभेत नगरसेवक आक्रमक

'स्पर्श'वर गुन्हा दाखल न केल्यास आयुक्तांवरच गुन्हा दाखल करण्याचा इशारा

0

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ऑटो क्लस्टरमध्ये चालविण्यात येत असलेल्या कोविड सेंटरमध्ये आयसीयू बेडसाठी एका रुग्णाच्या नातेवाईकांकडून स्पर्श संस्थेने तब्बल एक लाख रुपये घेतले. मयताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार आहे. ‘एक लाख रुपये द्या आणि ऑटो क्लस्टरमध्ये बेड मिळवा’ अशी परिस्थिती आहे. महापालिका पैसे देत असतानाही ‘स्पर्श’ संस्थेचे व्यवस्थापन दादागिरी करते. खासगी हॉस्पिटलशी सेटिंग करून बेडसाठी रुग्णांकडून लाख -लाख रुपये घेते. हे प्रकरण मिटविण्यासाठी 15 ते 20 लाख देण्याची तयारी दर्शविली होती. सत्तारूढ पक्षनेते मध्यस्थी करत होते. त्यामुळे ‘स्पर्श’ संस्था आणि वाल्हेकरवाडीतील ‘पद्मजा’ हॉस्पिटलवर खंडणी, दरोड्याचा, चोरीचा, सदोष मनुष्यवधाचा आजच्या आज गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी नगरसेवकांनी महासभेत केली.

‘स्पर्श’वर गुन्हा दाखल केला नाही तर आयुक्तांवरच गुन्हा दाखल करण्याचा इशारा नगरसेवकांनी दिला. संबंधित ठिकाणचे ‘सीसीटीव्ही’ फुटेज बाहेर काढा. हे प्रकार कोणते नगरसेवक चालवत आहे, धंदा करत आहे हे कळेल, असेही नगरसेवक म्हणाले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची विशेष सभा आज (शुक्रवारी) आयोजित केली होती. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या.

चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये महापालिकेचे कोविड हॉस्पिटल सुरू असून स्पर्श ही खासगी संस्था त्याचे संचलन करते. या हॉस्पिटलचा सर्व खर्च महापालिका करत आहे. मोफत उपचार होत असलेल्या या हॉस्पिटलमध्ये महापालिका शाळेच्या मुख्याध्यापिकेला आयसीयू बेड देण्यासाठी एक लाख रुपये घेतल्याचा संतापजनक प्रकार घडल्याचे वृत्त ‘एमपीसी न्यूज’ने प्रसिद्ध केल्यानंतर शहरात खळबळ उडाली होती. त्यावर नगरसेवकांनी सभागृहात आक्रमक पवित्रा घेतला.

या प्रकरणाचा भांडाफोड करणारे भाजपचे कुंदन गायकवाड यांनी ऑटो क्लस्टरमध्ये बेडसाठी एक लाख रुपये घेतल्याची ‘रेकॉर्डिंग’ सभागृहात ऐकविले. महापालिका पैसे देत असतानाही महापालिका मुख्याध्यापिकेलाच उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठी एक लाख रुपये घेतले. ‘स्पर्श’ खासगी हॉस्पिटलशी सेटिंग करून रुग्णांकडून पैसे उकळत आहेत.

मोफत असलेल्या बेडसाठी पैसे घेणाऱ्या खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टरला चोप देणारे भाजपचेच नगरसेवक विकास डोळस म्हणाले, “एक लाख रुपये द्या आणि ऑटो क्लस्टरमध्ये बेड मिळवा’, अशी परिस्थिती आहे. मयताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम चालू आहे. ऑटो क्लस्टरला महापालिका पैसे देते, ते जनतेचे पैसे आहेत. स्पर्शचा करार तोडा, त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करावा. तिथे बाऊंसर कशासाठी ठेवले आहेत. आम्हाला, महापालिका अधिकाऱ्यांना आतमध्ये जाऊन देत नाहीत. तेथील सीसीटीव्ही फुटेज का दिले जात नाही. स्पर्शला काम देऊन लागलेला कलंक, काळिमा पुसला पाहिजे.”

भाजपच्या सुजाता पालांडे म्हणाल्या, “रुग्णांकडून बेडसाठी पैसे घेणाऱ्या ‘स्पर्श’वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. अन्यथा आयुक्तांवर गुन्हा दाखल केला जाईल. स्पर्श संस्थेला ऑटो क्लस्टर हॉस्पिटल चालवायला दिल्यामुळे ‘कपाळमोक्ष’ केले असे म्हणण्याची आयुक्तांवर वेळ येईल. सगळा अंदाधुंदी कारभार चालला आहे. त्यांच्याकडून काम काढून घ्या; अन्यथा नगरसेवकांचे मोठे आंदोलन उभारले जाईल”.

शिवसेनेच्या मीनल यादव म्हणाल्या, “ऑटो क्लस्टर हॉस्पिटल कोणाच्या बापाचे नाही. महापालिकेने आंदण दिले नाही. 1 लाख रुपये दिल्यावर बेड मिळतो”. “स्पर्शमध्ये भ्रष्ट लोक असताना त्यांनाच काम दिले जाते”, असे भाजपच्या आशा शेंडगे म्हणाल्या.

_MPC_DIR_MPU_II

शिवसेनेचे सचिन भोसले म्हणाले, “स्पर्शला काम का दिले ?. त्यांच्या मागे नेमके कोण आहे ?. लाचखोर डॉक्टर पैसे घेऊन बेड मिळवून देत आहेत. यात मोठे रॅकेट आहे. चौकशी झाली पाहिजे. स्पर्शवर गुन्हा दाखल झाला पाहिजे”.

भाजपचे संदीप वाघेरे म्हणाले, “बेड देण्यासाठी स्पर्शने पैसे घेतले. त्यामुळे स्पर्श आणि वाल्हेकरवाडीतील ‘पद्मजा’ हॉस्पिटलवर गुन्हा दाखल केला पाहिजे. स्पर्श दुकानदारी करत असून त्यांच्या मागे कोण आहे त्यांची दुकानदारी बंद करावी. आयुक्तांनी पारदर्शकता आणावी, बेधडकपणे कारवाई करावी”.

भाजपच्या सीमा सावळे म्हणाल्या, “महापालिकेच्या आशिर्वादाने चालणाऱ्या ऑटो क्लस्टर हॉस्पिटलमध्ये बेडसाठी रुग्णांकडून पैसे उकळले जातात. यामध्ये ज्यांची भागीदारी आहे, त्या नगरसेवकांचे पद रद्द करावे. स्पर्शवर गुन्हा दाखल करावा; अन्यथा आयुक्तांवर गुन्हा दाखल केला जाईल”.

भाजपचे एकनाथ पवार म्हणाले, “ऑटो क्लस्टर, जम्बो कोविड सेंटर महापालिकेने चालवावे. 1 तारखेपासून महापालिकेच्या ताब्यात घ्यावे. मानधनावर काम करणाऱ्या डॉक्टरांना कायम करावे”.

राष्ट्रवादी काँग्रेसचे योगेश बहल म्हणाले, “स्पर्शने खासगी हॉस्पिटलशी सेटिंग करून बेडसाठी पैसे घेतले. तिथे रुग्णांची लूट केली जाते. मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. हे प्रकरण मिटविण्यासाठी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके हे कुंदन गायकवाड यांना समजविण्यासाठी गेले होते. हे प्रकरण ऍडजस्ट करण्यासाठी 15 ते 20 लाख देण्याची तयारी दर्शविली होती. स्पर्शच्या भ्रष्टाचाराला भाजपने पाठिंबा दिला. ऑटो क्लस्टर हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेज बाहेर काढा. कोण नगरसेवक चालवत आहे, धंदा करत आहे हे कळेल. लोकांचे जीव घेऊन पैसे कमविण्याचे काम केले जात आहे”.

शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले, “महापालिका हॉस्पिटलमध्येच महापालिका मुख्याध्यापिकेला बेड देण्यासाठी एक लाख रुपये स्पर्शने घेतले हे दुर्दैव आहे. भामट्या लोकांना पाठीशी घातले. पोलिसांना सांगून दरोडा, चोरीचा गुन्हा दाखल करावा. चौकशी लावावी. स्पर्शला का कायम ठेवले, वेळीच कारवाई केली असती तर आज ही वेळ आली नसते. ‘स्पर्श’वर कारवाई झालीच पाहिजे”.

विरोधी पक्षनेते राजू मिसाळ म्हणाले, “महापालिका हॉस्पिटलमध्ये बेडसाठी पैसे घेतले जात असल्याचा प्रकरण दोन नगरसेवकांनी उघडकीस आणले. रेकॉर्डिंग सभागृहात ऐकविले. या प्रकरणाची शहानिशा करावी. चुकीचे काम करणाऱ्याला शासन झाले पाहिजे. या चुकीच्या गोष्टीमुळे चांगल्या कामाला गालबोट लागले. शहराकडे बघण्याच्या नागरिकांचा दृष्टीकोण बदलला आहे”.

सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, “चुकीचे काम भाजपच्या नगरसेवकांनी उघडकीस आणले. ज्यांनी पैसे घेतले, चुकीचे काम केले त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करावा. महापालिकेचे नाव खराब करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. आम्ही सेटलमेंट करत नाही. आम्हाला ठेकेदारांचे घेणेदेणे नाही. कोणाची दुकानदारी चालू देऊ नये’.

अंबरनाथ कांबळे, अजित गव्हाणे, तुषार हिंगे, वैशाली घोडेकर, सचिन चिखले यांनी चर्चेत भाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment