Pimpri News: बोगस एफडीआर देवून फसवणूक करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करा – सुलभा उबाळे

एमपीसी न्यूज – कंत्राट घेताना बोगस एफडीआर (फिक्स्ड डिपॉझिट रिसीट) आणि बँक हमी देवून पालिकेची फसवणूक करणा-या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करावेत. तसेच संबंधित अधिका-यांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिरुर जिल्हा महिला संघटिका सुलभा उबाळे यांनी केली आहे.

भाजपची सत्ता आल्यानंतर अधिकारी व पदाधिका-यांनी संगनमाने पालिका लुटल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात उबाळे यांनी म्हटले आहे की, बोगस एफडीआर प्रकरणामुळे पालिकेची बदनामी झाली आहे. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत असा पालिकेचा एकेकाळी गौरव होता. परंतु, बोगस एफडीआर प्रकरण असेल किंवा टक्केवारीसाठी होणारी नगरसेवकांची भाडणे असतील. यामुळे पालिका बदनाम झाली आहे.

एफडीआरप्रकरणी ठेकेदारांना फक्त तीन वर्ष पालिकेच्या निविदा भरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. भाजपची सत्ता आल्यानंतर अधिकारी व पदाधिका-यांनी संगनमाने पालिका लुटली आहे. एफडीआर बोगस दिले असतील, तर विकास कामाचा दर्जा देखील बोगसच असणार आहे.

या ठेकेदारांना तीन वर्षासाठी काळ्या यादीत टाकून उपयोग नाही. कारण, तोच ठेकेदार दुस-या नावाची फर्म काढून पुन्हा असले धंदे करायला मोकळा आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा. त्यांच्या चालू असलेल्या सर्व कामांचा दर्जा तपासावा. ही कामे दुस-या लघुत्तम ठेकेदारांकडून करुन घ्यावीत.

या ठेकेदारांच्या नावाने दुस-या कुठल्याही कंपनीला पालिकेने निविदेत सामिल करुन घेवू नयेत. याप्रकरणी कडक कारवाई करावी. अन्यथा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाईल. त्यात ठेकेदारांबरोबर अधिका-यांनाही प्रतिवादी केले जाईल, असा इशारा उबाळे यांनी दिला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.