Pimpri News: पोटनिवडणुकीची अंतिम मतदारयादी प्रसिद्ध; चार वर्षात प्रभाग एकमध्ये वाढले दुप्पट मतदार

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील निधन झालेल्या तीन नगरसेवकांच्या रिक्त जागेवरील पोटनिवडणुकांसाठी महापालिकेने अंतिम मतदार यादी आज (बुधवारी) प्रसिद्ध केली. त्यानुसार चार वर्षात प्रभाग क्रमांक एक चिखलीमध्ये दुप्पट मतदार वाढले, या मतदार संघात 66 हजार 142 मतदार आहेत. प्रभाग क्रमांक 4 दिघी बोपखेलमध्ये 42 हजार 433 आणि प्रभाग क्रमांक 14 काळभोरनगर, आकुर्डीत 50 हजार 289 जण पोटनिवडणुकीसाठी मतदान करु शकणार आहेत. यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून 15 जानेवारी 2021 पर्यंत अद्यावत केलेली विधानसभेची मतदार यादी वापरण्यात आली आहे.

प्रभाग क्रमांक 1 चिखलीमधून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता साने यांचे कोरोनामुळे 4 जुलै 2020 रोजी, प्रभाग क्रमांक 14 काळभोरनगर, चिंचवड स्टेशन, दत्तवाडी प्रभागातून निवडून आलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांचे कोरोनामुळे 31 जुलै 2020 रोजी आणि प्रभाग क्रमांक चार दिघी-बोपखेलमधून निवडून आलेले भाजपचे लक्ष्मण उंडे यांचे 26 सप्टेंबर 2020 रोजी कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागी पोटनिवडणूक होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिकेने पोटनिवडणुकीसाठीची मतदार यादी तयार केली. प्रभानिहाय अंतिम मतदार यादी आज प्रसिद्ध केली आहे. त्यात प्रभाग क्रमांक 1 तळवडे गावठाण- चिखलीत महिला 29 हजार 504, पुरुष 36 हजार 634 आणि इतर 4 असे एकूण 66 हजार 142 मतदार आहेत. 2017 च्या निवडणुकीत 33 हजार 794 मतदारसंख्या होती. चार वर्षात प्रभागात दुप्पटीने मतदार वाढ झाली आहे.

_MPC_DIR_MPU_II

प्रभाग क्रमांक 4 दिघी -बोपखेलमध्ये 19 हजार 599 महिला, 22 हजार 833 पुरुष आणि 1 इतर असे एकूण 42 हजार 433 मतदार आहेत. 2017 च्या निवडणुकीत 36 हजार 666 मतदारांची संख्या होती. 5 हजार 767 मतदार वाढले आहेत.

तर, प्रभाग क्रमांक 14 काळभोरनगर, चिंचवड स्टेशन, दत्तवाडी-आकुर्डी गावठाणात 23 हजार 301 महिला, 26 हजार 987 पुरुष आणि इतर 1 असे 50 हजार 289 मतदार आहेत. 2017 च्या निवडणुकीत 45 हजार 704 मतदार संख्या होती. चार वर्षात 4 हजार 585 मतदार प्रभागात वाढले आहेत.

याबाबत निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर म्हणाले, ”प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. 8 मार्च रोजी मतदान केंद्राची यादी प्रसिद्ध केली जाईल. निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर होईल हे सांगता येत नाही. कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. परंतु, निवडणूक पुढे ढकलली जाईल का याबाबत आता काहीही सांगू शकत नाही”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.