Pimpri News: अखेर बोगस ‘एफडीआर’ प्रकरणी फौजदारी कारवाईला सुरुवात

पाच ठेकेदारांविरोधात गुन्हे दाखल करण्याबाबत महापालिकेचा पोलिसांना लेखी अर्ज

एमपीसी न्यूज – बोगस एफडीआर (फिक्स्ड डिपॉझिट रिसीट) आणि बँक हमी देवून कंत्राट घेत महापालिकेची फसवणूक करणा-या ठेकेदारांवर अखेर फौजदारी कारवाईची प्रक्रिया सुरु झाली आहे. सबळ कागदोपत्री पुरावे हाती लागलेल्या पाच ठेकेदारांविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याबाबत महापालिकेने पिंपरी पोलिसांना लेखी अर्ज दिला आहे. त्यानुसार पाच ठेकेदारांविरोधात लवकरच गुन्हे दाखल होतील.

महापालिका स्थापत्य विभागाचे प्रशासन अधिकारी रमेश वस्ते यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात लेखी अर्ज दिला आहे.

बोगस एफडीआर दिल्याप्रकरणी डीडी कन्सट्रक्शन (दिनेश मोहनलाल नवानी), वैदेही कन्सट्रक्शन (दयानंद जीवन माळगे), एसबी सवाई (संजय बबन सवई), मेसर्स पाटील ॲण्ड असोसिएट (सुजीत सुर्यकांत पाटील) आणि कृती कन्सट्रक्शन (विशाल हनुमंत कु-हाडे) यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात यावेत असे अर्जात म्हटले आहे.

महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडील कामांसाठी हे पाच ठेकेदार प्रथम लघुत्तम असल्याने त्यांनी निविदा अटी-शर्तीनुसार अतिरिक्त सुरक्षा अनामत (पीएसडी) व सुरक्षा अनामत (एसडी) महापालिकेकडे जमा करणे आवश्यक होते. सदर रकमेपोटी संबंधित ठेकेदारांनी सादर केलेली फिक्स्ड डिपॉझिट रिसीट (एफडीआर) आणि बँक हमी पडताळणीकामी पाठविली.

त्यात बँकांनी एफडीआर आणि बँक हमी या ठेकेदारांना दिली नसल्याचे सांगितले. या ठेकेदारांनी बनावट एफडीआर, बँक हमी सादर करुन महापालिकेची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध 420 कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, असे महापालिकेने पोलिसांना दिलेल्या लेखी अर्जात म्हटले आहे. सोबत कागदपत्रे देखील दिली आहेत.

याबाबत पिंपरी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलींद वाघमारे म्हणाले, ”बोगस एफडीआर प्रकरणी गुन्हे दाखल करण्याबाबत महापालिकेचा लेखी तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. कागदपत्रांची पडताळणी करुन दोषींवर गुन्हे नोंदविण्यात येतील”.

‘या’ 13 ठेकेदारांवरही होणार गुन्हे दाखल !

श्री दत्त कृपा एंटरप्रायजेस (दत्तात्रय महादेव थोरात), सोपान जनार्दन घोडके (सोपान जनार्दन घोडके), दीप एंटरप्रायजेस (पूर्वा ठाकूर), बीके खोसे (भास्कर खंडू खोसे), बीके कन्सट्रक्शन ॲण्ड इंजिनिअरिंग (परमेश्वर हणमंत क्याटनकारी), एचए भोसले (हनुमंत भोसले), भैरवनाथ कन्सट्रक्शन (नंदकुमार मथुराम ढोबळे), डीजे एंटरप्रायजेस (ज्योती दिनेश नवानी), म्हाळसा कन्सट्रक्शन प्रा. लि (आकाश श्रीवास्तव), अतुल आरएमसी (अतुल चंद्रकांत रासकर), चैतन्य एंटरप्रायजेस (अपर्णा महेश निघोट), त्रिमुती कन्सट्रक्शन (संदीप लोहर) आणि राधिका कन्सट्रक्शन (अटल बुधवाणी) या 13 ठेकेदारांवर देखील फसवणुकीचे गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

त्यासाठी सबळ कागदोपत्री पुरावे गोळा करण्याचे काम सुरु असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले. 18 ठेकेदारांना काळ्यात यादीत टाकले आहे. त्यांना तीन वर्ष पालिकेच्या निविदा भरण्यास प्रतिबंध केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.