Pimpri News: भामा आसखेड पाणी आरक्षणासाठी कोटींचा पहिला हप्ता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरासाठी भामा आसखेड धरणातून 60.79 दशलक्ष घनमीटर पाणी कोटा आरक्षित करण्यात आला आहे. महापालिकेला पाणी आरक्षणाच्या सिंचन पुनर्स्थापना खर्चापोटी 208 कोटी 65 लाख रुपये चासकमान पाटंबधारे विभागाला द्यावे लागणार आहेत. त्यासाठीचा पहिला 35 कोटी 55 लाख 60 हजारांचा पहिला हप्ता अदा करण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत शहराच्या लोकसंख्यावाढीचा वेग आणि भविष्यातील सन 2045 पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन महापालिकेकडून सरकारला आंद्रा व भामा आसखेड धरणातून पाणी आरक्षित करण्यासाठी मागणी करण्यात आली होती. शहराच्या चिखली, चऱ्होली, वडमुखवाडी, दिघी आणि मोशी परिसरात पाणीपुरवठ्यासाठी या पाण्याची शहराला गरज आहे.

त्यापैकी भामा आसखेड धरणातून पाणी तातडीने आणसाठी कामेही सुरू झाली आहेत. त्यानुसार सरकारने भामा आसखेड धरणातून 60.79 दशलक्ष घनमीटर पाणी कोटा आरक्षणास 13 नोव्हेंबर 2018 रोजी मान्यता दिलेली आहे. पुणे पाटबंधारे खात्याने सिंचन पुर्नस्थापना खर्चापोटी 208 कोटी 65 लाख रुपये भरण्यास सांगितले होते.

त्यापैकी पुनर्वसन खर्चापोटी 30 कोटी 87 लाखांचा खर्च पालिकेने अदा केला आहे. तो खर्च वगळून 177 कोटी 78 लाख रुपये पालिकेला द्यावे लागणार असून ही रक्कम पाच हप्त्यात भरावी लागणार आहे. त्यापैकी पहिला हप्ता 35 कोटी 55 लाख 60 हजारांचा हप्ता महापालिकेकडून पाटबंधारे विभागाला अदा करण्यात येणार आहे. जलवाहिनी टाकण्याचे व चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण झाल्यानंतर हे पाणी उचलून ते शहरवासीयांना पुरविता येणार आहे. शहरातील पाणीटंचाई संपविण्यासाठी हा प्रकल्प शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.