Pimpri News : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनुयायांचे अभिवादन

एमपीसी न्यूज – भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त, आज (दि.06) पिंपरीतील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास हजारो अनुयायांनी अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 65 वा महापरिनिर्वाण दिवस आहे. अनुयायांनी बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पगुच्छ अर्पण केला तर, अनेकांनी मेणबत्ती प्रत्वलीत करून अभिवादन केले.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरीतील बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या ठिकाणी अनुयायांनी सकाळपासूनच गर्दी केली. पुष्पहार, मेणबत्ती लावून अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. मागील वर्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम होऊ शकला नव्हता. एका वर्षानंतर अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांच्या चेह-यावर आनंद दिसत होता. यावेळी स्मारक परिसरात विविध उपक्रमांचे आयोजन केले होते.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी विविध मान्यवरांची व्याखाने पार पडली. तसेच,  रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली. भीम अनुयायांनी स्मारक परिसरात थोळा काळ विसावा घेत बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण केले. यावेळी स्मारक परिसरातील भित्तीचित्रांना नागरिकांना भेट देत बाबासाहेबांशी निगडीत इतिहासातील महत्वपूर्ण घटना जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

स्मारक परिसरात बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित असलेली पुस्तक विक्रीसाठी आलेले विक्रेते, तसेच मूर्ती विक्रेते आणि फूल विक्रेत्यांनी हजेरी लावल्याचे पहायला मिळाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.