Pimpri News: गर्दीच्या नियंत्रणासाठी महापालिका कर्मचाऱ्यांना  ’50-50’चा  फॉर्म्युला

महापालिका कार्यालयांत आळीपाळीने काम; अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना हा आदेश लागू नाही

एमपीसी न्यूज – कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयातील गर्दी नियंत्रणात असावी यासाठी 50 टक्केच कर्मचारी उपस्थितीचा निर्णय घेण्यात आला  आहे. 31 मार्चपर्यंत  कर्मचा-यांनी आळीपाळीने महापालिकेत उपस्थित रहावे, असे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी काढले आहेत. आवश्यकता भासल्यास या कर्मचा-यांना  कार्यालयामध्ये उपस्थित राहणे अनिवार्य राहील. दरम्यान, वैद्यकीय, आरोग्य विभाग, पाणीपुरवठा, विद्युत अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना हा आदेश लागू राहणार नाही.

मागील काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दिवसाला 800 च्या पुढे नवीन रुग्ण सापडत होते. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी वगळता महापालिका कार्यालयांतील दैनंदिन उपस्थिती 50 टक्के ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

त्यानुसार महापालिका कार्यालयातील गट-‘अ’, गट ‘ब’ अधिका-यांची उपस्थिती एकूण पदसंख्येच्या 100 टक्के राहील. गट ‘अ’, ‘ब’ अधिका-यांव्यतिरिक्त इतर कर्मचारी वर्गाची दैनंदिन उपस्थिती 31 मार्च 2021 अखेरपर्यंत एकूण संख्येच्या 50 टक्के क्षमतेने कार्यरत ठेवण्यात यावी. रोटेशन पद्धतीने कार्यालयातील उपस्थिती निश्चित करावी.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना हा आदेश लागू नसेल.  गर्भवती महिला, अवयव प्रत्यारोपण केलेले, केमो थेरपी, इम्युनोसप्रेसिव्ह थेरपी घेत असलेले अधिकारी, कर्मचा-यांना कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सवलत राहील. त्यासाठी त्यांनी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.

दिव्यांग अधिकारी, कर्मचा-यांना कार्यालयामध्ये उपस्थित राहण्यापासून देण्यात आलेली सवलत पुढील आदेशापर्यंत कायम राहील. तथापि, जे दिव्यांग कर्मचारी स्वेच्छेने कार्यालयात उपस्थित राहू इच्छितात त्यांना परवानगी आहे.

महापालिकेच्या सर्व कार्यालयांना या सूचना लागू आहेत. महापालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचा-यांनी महापालिका कार्यक्षेत्र सोडू नये. विभागप्रमुखांनी आवश्यकता भासल्यास कार्यालयामध्ये उपस्थित राहण्यास सूचना दिल्यास संबंधितांनी कोणतेही कारण न सांगता तत्काळ उपस्थित राहणे बंधनकारक राहील, असे आयुक्त पाटील यांनी परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.