Pimpri News : कोरोना अ‍ॅन्टीजेन टेस्टसाठी चार हजार किट

एमपीसी न्यूज – कोरोना रुग्णांचे तातडीने निदान व्हावे याकरिता महापालिकेमार्फत रॅपिड अन्टीजेन टेस्टच्या चार हजार किट खरेदी करण्यात येणार आहेत. या चार हजार किटद्वारे कोरोनाच्या तब्बल एक लाख चाचण्या होऊ शकणार आहेत. त्यासाठी चार कोटी रुपये खर्च होणार आहे.

शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा 95 हजार 436 वर पोहोचला आहे. शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असली तरी अजूनही कोरोनाचा धोका संपलेला नाही. शहरात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. शहरातील नागरिकांची कोरोना चाचणी करण्यासाठी तातडीने रॅपिड अन्टीजेन टेस्ट किटस खरेदी करण्यासाठी पाच दिवसाची निविदा नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती.

_MPC_DIR_MPU_II

त्यानुसार, चार निविदा धारकांनी दरपत्रक सादर केले. त्यामध्ये कोठारी मेडीकल आणि एसडी बायोसेन्सॉर या दोन्ही ठेकेदारांचे दर सारखे आल्याने त्यांना पुन्हा दर सादर करण्याबाबत विचारणा करण्यात आली. एसडी बायोसेन्सॉर यांनी ई-मेलद्वारे प्रति टेस्ट 365 रूपये अधिक 12 टक्के जीएसटी याप्रमाणे प्रति टेस्ट 408 रूपये 80 पैसे असा दर सादर केला. तर, कोठारी मेडीकल यांनी प्रति टेस्ट 363 अधिक 12 टक्के जीएसटी याप्रमाणे प्रति टेस्ट 406 रूपये 56 पैसे असा दर सादर केला.

कोठारी मेडीकल यांचा दर अंदाजित दरापेक्षा 9.25 टक्के पेक्षा कमी आहे. या दरास अंतर्गत लेखापरिक्षक यांची मान्यता घेण्यात आली आहे. मायक्रो बायोलॉजिस्ट यांच्यामार्फत रॅपिड अन्टीजेन टेस्टचा डेमो घेण्यात आला. त्यामध्ये हे किट वापरासाठी समाधानकारक असल्याचा अभिप्राय दिला आहे. त्या अनुषंगाने कोठारी मेडीकल यांनी सादर केलेल्या दराप्रमाणे चार हजार किट खरेदी करण्यात येणार आहेत.

प्रति किट 25 टेस्ट यानुसार चार हजार किटद्वारे कोरोनाच्या तब्बल एक लाख चाचण्या होऊ शकणार आहेत. त्यानुसार, या किट खरेदीकरिता 4 कोटी 6 लाख रूपये इतका खर्च अपेक्षित आहे. हा खर्च भांडार विभागाकडील कोरोना निधी या लेखाशिर्षावरील उपलब्ध तरतुदीमधून भागविण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.