Pimpri news: ‘सर्व खासगी शाळांमधील शिक्षकांची कोरोना चाचणी मोफत करा’ – अतुल शितोळे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी शाळांमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची कोरोना ‘आरटी-पीसीआर’ चाचणी मोफत करावी, अशी मागणी महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात शितोळे यांनी म्हटले आहे की, महापालिका हद्दीतील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा 30 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे नियोजन आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांनी 20 नोव्हेंबर रोजी यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. त्यामध्ये सर्व शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची कोरोना ‘आरटी-पीसीआर’ चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.

परिपत्रकात ही चाचणी सरकारी केंद्रामध्ये मोफत करावी, असाही उल्लेख आहे. मात्र, महापालिकेच्या वैद्यकीय केंद्रात केवळ सरकारी, निमसरकारी आणि अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी मोफत केली जात आहे. तर, खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना कोरोना चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळेत जाऊन तपासणी करावी, असे महापालिका वैद्यकीय विभागाकडून सांगितले जात आहे.

काही खासगी संस्था पैसे वाचविण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी करण्याकडे दुर्लक्ष करतील. यातून विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण निर्माण झाल्यास कोण जबाबदार राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या हिताचा विचार करून खासगी शाळांमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी मोफत करावी, अशी मागणी शितोळे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.