Pimpri News: स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शुक्रवारी निवडणूक; उद्या भरणार अर्ज

रवी लांडगे, शत्रुघ्न काटे, नितीन लांडगे यांच्यात चुरस

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी उद्या (मंगळवारी) दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज भरायचे आहेत. तर अध्यक्षपदाची प्रत्यक्ष निवडणूक शुक्रवारी (दि.5) दुपारी बारा वाजता होणार आहे. दरम्यान, अध्यक्षपदासाठी भाजपमधील रवी लांडगे, शत्रुघ्न काटे आणि नितीन लांडगे यांच्यात चुरस आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीत 16 सदस्य आहेत. यात भाजपचे 10, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4, शिवसेना 1 आणि अपक्षांचा एक नगरसेवक संख्याबळानुसार स्थायी समितीत नियुक्त झाले आहेत.

भाजपचे नितीन लांडगे, रवी लांडगे, सुरेश भोईर, शत्रुघ्न काटे, शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, अभिषेक बारणे, सुवर्णा बुर्डे, भीमाबाई फुगे, भाजप संलग्न नीता पाडाळे, राष्ट्रवादीच्या पोर्णिमा सोनवणे, सुलक्षणा धर, राजू बनसोडे, प्रवीण भालेकर आणि शिवसेनेच्या मीनल यादव असे 16 सदस्य स्थायी समितीत आहेत.

अपक्ष सदस्य भाजपसोबत आहेत. भाजपचे स्थायीत बहुमत असल्याने भाजपचा अध्यक्ष होणार हे स्पष्ट आहे.

पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी स्थायी समिती अध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार उद्या (मंगळवारी) दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत नामनिर्देशन पत्रे स्वीकारली जाणार आहेत. 5 मार्च रोजी दुपारी बारा वाजता अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुण्यातील नोंदणी व मुद्रांक विभागाचे महानिरीक्षक श्रावण हर्डीकर कामकाज पाहणार आहेत, अशी माहिती पिंपरी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.